Goa: तीन अल्पवयीनांकडून एकावर प्राणघातक हल्ला, बेसबॉलच्या बॅटने मारहाण
By वासुदेव.पागी | Published: October 11, 2023 01:53 PM2023-10-11T13:53:41+5:302023-10-11T13:54:21+5:30
Goa Crime News: ३ अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीचा थरार घडवून आणताना एका मुलाला बेसबॉल बॅटने बेदम मारहाण केली. मुलावर इस्पितळात उपचार सुरू असून मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- वासुदेव पागी
पणजी - ३ अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीचा थरार घडवून आणताना एका मुलाला बेसबॉल बॅटने बेदम मारहाण केली. मुलावर इस्पितळात उपचार सुरू असून मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांपाल येथे एका मुलाचा आणि त्याच्या आणखी एका अल्पवयीन मुलाचा कसल्या तरी व्यवहारातून वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. मारणाऱ्या मुलाच्या मदतीला आणखी दोघे धाऊन आल्यानंतर तिघांनी मिळून त्या मुलाला बेदम मारहाण केली. बेसबॉलच्या बॅटने त्याला मारहाण केली. ज्याला मारहाण करण्यात आली तोही अल्पवयीन आहे आणि हल्लेखोरही अल्पवयीन आहेत. मारहाणीनंतर मुलाला गंभीर जखमा झाल्या असून रक्तस्त्रावही झाला आहे.त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पणजी पोलिसांनी कारवाई करून तिघाही हल्लेखोरांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत तपास चालू होता. तिघांवरही खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तिघांनाही मेरशी येतील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
म्हणून प्रकरण उघडकीस
हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणात अडकलेली मुले ही गुन्हेगारी प्रवृत्तीचीच असल्यामुळे हा प्रकार उघडकीस येऊ न देण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु मारहाण करण्यात आलेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे कुटुंबियांकडून या प्रकरणात तक्रार नोंदविण्यात आली आणि प्रकरण उघडकीस आले.
ही कसली नशा?
हल्लेखोर त्या मुलाला बेफाम होऊन मारहाण करीत होते. इतरांनी रोखण्याचा प्रयत्न केला असतानाही ते कुणाला ऐकत नव्हते. त्यामुळे ते कसल्या तरी नशेत होते असा प्राथमिक अंदाज होता.परंतु ही घटना घडून तीन दिवस उलटले असल्यामुळे अंमली पदार्था संबंधी चाचणी घेऊन काहीच निष्कर्ष येणार नसल्यामुळे पोलिसांनी चाचणी घेतली नाही.