गोवा - इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशिप २०२४ च्या वन लेगचे यंदा राज्यात आयोजन
By समीर नाईक | Published: May 28, 2024 04:38 PM2024-05-28T16:38:31+5:302024-05-28T16:45:08+5:30
फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचा (एफएमएससीआय ) पाठिंबा असलेल्या या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला टप्पा १ आणि २ जून रोजी चेन्नई येथे सुरू होईल.
पणजी: इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशिपच्या वन लेगचे आयोजन गोवा करणार आहे. या वर्षी ७ आणि ८ डिसेंबर रोजी या चॅम्पियनशिपचे आयोजन होणार आहे. ही रॅली भारतातील सहा शहरांमध्ये होईल. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचा (एफएमएससीआय ) पाठिंबा असलेल्या या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला टप्पा १ आणि २ जून रोजी चेन्नई येथे सुरू होईल.
दक्षिण विभाग पात्रता पूर्ण करण्यासाठी दुसरा टप्पा २० आणि २१ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. त्याचप्रमाणे, उत्तर विभाग पात्रता चंदीगडमध्ये ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी, पूर्व विभाग पात्रता २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे, पश्चिम विभाग पात्रता ७ आणि ८ डिसेंबर रोजी गोव्यात तर अंतिम फेरी १५ आणि १६ डिसेंबर रोजी पुण्यात होईल.
या कार्यक्रमात ५० वर्षांवरील मोटारसायकल स्वारांसाठी प्रथमच ‘वेटेरन्स’ श्रेणी असणार आहे. याशिवाय टीम वर्कला प्रोत्साहन देणारी ‘टीम आणि मॅन्युफॅक्चरर्स ट्रॉफी’ असेल. तसेच, तिसऱ्या फेरीपासून स्पर्धेच्या आदल्या दिवशी विशेष नवशिक्यांचे प्रशिक्षण सत्र होणार आहे. या स्पर्धेमध्ये १२ श्रेणी असतील. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातील.