Goa: डुक्कराची उघड्यावर कत्तल करून विक्री, धक्कादायक प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:31 PM2023-03-14T18:31:30+5:302023-03-14T18:33:48+5:30
Goa News: पेटके धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पासून सुमारे ५० मीटर अंतरावर डुक्कराची उघड्यावर कत्तल करून त्याचे परस्पर वितरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
- अजय बुवा
फोंडा (गोवा) - पेटके धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पासून सुमारे ५० मीटर अंतरावर डुक्कराची उघड्यावर कत्तल करून त्याचे परस्पर वितरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा प्रकार स्थानिक युवकांनी वन खात्याच्या नजरेस आणून दिला. मुख्य बाब म्हणजे येथे कत्तल करण्यासाठी चक्क आंध्र प्रदेश मधून डुक्कर आणण्यात आले होते.सदरची कत्तल करून घरगुती डुक्कराचे मास हे रानटी डुक्कराचे मास म्हणून विकले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
सविस्तर वृत्तानुसार मनुष्य वस्ती पासून लांब असलेल्या या परिसरात खुलेआम कत्तल खाना चालू होता.गेल्या २-३ वर्षापासून सदर प्रकार सुरू आहे. मंगळवारी सदर ठिकाणावर धाड घातली असता त्या ठिकाणी डुकरांची कत्तल होत असल्याचे आढळून आले. वन खात्याने एक रिक्षा तसेच ८० किलो डुक्कराचे मास जप्त करून दोघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काही संशयितांनी जंगलातून पळ काढला. मंजुनाथ दोडामणी व बसावा दोडामणी याना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यानी १४ जिवंत डुक्करावर उपचार करण्यासाठी त्यांच्या रवानगी बोंडला येथील प्राणी संग्रहालयात केली आहे.
पेटके येथे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना परिसरात दुर्गंधी येत होती. स्थानिक युवकांनी यासंबधी काहीतरी काळेबेरे होत असल्याचा संशय येत होता. सतर्क राहून परिसरात बेकायदेशीर सुरू असलेल्या डुक्कराच्या कत्तलीचा प्रकार मंगळवारी सकाळी त्यानी उघडकीस आणला. सदर युवकांनी स्थानिक पंच महेश नाईक व सरपंच बालाजी गावस यांना माहिती दिल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. कुळे वन विभागाचे अधिकारी नारायण प्रभुदेसाई व इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची तपासणी केली. त्यावेळी घटनास्थळी ४ कत्तल केलेले डुक्कर व १४ जिवंत डुक्कर आढळून आले. पशु संवर्धन खात्याचे डॉ. केतन चौघुले यांनी डुक्कराचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठवले आहे. उपवनपाल आनंद जाधव, विश्वास चोडणकर, वन अधिकारी नारायण प्रभुदेसाई व इतरांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. पिळये धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ संदेश मडकईकर यांनी सुद्धा परिसरात जावून पाहणी केली.
कुळे वन विभागाचे अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी माहिती मिळाल्यानंतर परिसरात जावून पाहणी करून ८० किलो मास जप्त करण्यात आले आहे. सदर मासाचे नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर मास पाळीव की रानटी डुक्कराचे असल्याचे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून जागेच्या मालकाची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे. जिवंत असलेल्या १४ डुक्कराची रवानगी बोंडला प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आली असल्याचे सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून फोंडा, मडगाव, वाळपई, साखळी, कुडचडे व अन्य भागात रानटी डुक्कराचे मास ५०० ते ७०० रुपयामध्ये विक्री करण्यात येत होती. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता सदर डुक्कराचे मास पेटके येथून पुरवठा केले जात असल्याचा संशय होता.आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात गोव्यातील बाजारात पाळीव डुक्कराची आयात करणारी एक खास टोळी कार्यरत आहे. फोंडा येथे काही वर्षांपूर्वी कर्नाटक येथील एसटी बस मधून डुक्कराचे मास वन खात्याने पकडले होते. त्यावेळी सुद्धा सदर मास पाळीव डुक्कराचे असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते.
सरपंच बालाजी गावस यानी ह्या संदर्भात आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की,पंचायत क्षेत्रातील युवकांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या डुक्कराची कत्तल करण्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. इतर गावातील लोक पंचायत क्षेत्रात येवून बेकायदेशीर कृत्य करीत आहेत हे बरोबर नाही. पंचायत सुध्दा याबाबत सतर्क राहणार असून ,वन खात्याने यासंबंधी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.