बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांची एसीबीकडून 3 तास चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 06:43 PM2018-02-09T18:43:10+5:302018-02-09T18:43:31+5:30

गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाच लुचपतविरोधी विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) तब्बल तीन तास चौकशी केली. 

Goa : Opposition Leader Babu Kawalekar's 3 hours inquiry by ACB | बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांची एसीबीकडून 3 तास चौकशी 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांची एसीबीकडून 3 तास चौकशी 

Next

पणजी : गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाच लुचपतविरोधी विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) तब्बल तीन तास चौकशी केली. मडगांवच्या सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्याने कवळेकर  सकाळीच एसीबीच्या कार्यालयात हजर झाले. एसीबी अधीक्षक प्रियांका कश्यप यांच्याशी संपर्क साधला असता कवळेकर यांची सुमारे तीन तास चौकशी झाल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. चौकशीचा तपशील आपण याघडीला उघड करू शकत नसल्याचे नमूद करुन त्यांनी याबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले. कवळेकर यांना पुन: चौकशीसाठी बोलावले आहे का, या प्रश्नावर सध्या तरी त्यांना समन्स काढलेले नाही, असे कश्यप यांनी सांगितले. 

कवळेकर यांच्या विरोधात 2013 साली बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तत्कालीन भाजपा सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या प्रकरणात त्यानंतर सुमारे पाच वर्षांनी म्हणजे 2017 साली गुन्हा नोंद करण्यात आला. एसीबीने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहावे, अशी नोटीस दिल्याने त्यांनी अटकेच्या भीतीने मडगांव येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. 

पोलिसांना नेहमीच सहकार्य : कवळेकर 

एसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बाबू कवळेकर म्हणाले की, ‘गेली ६ वर्षे या चौकशी चालू आहे आणि आजपर्यंत किमान २0 वेळा हजर राहिलो आहे. प्रत्येकवेळी पोलिसांना तपासकामात सहकार्य केले असून यापुढही सहकार्य करणार आहे. ज्या ज्यावेळी पोलीस बोलावतात तेव्हा मी उपस्थित होतो. ही चौकशी नि:पक्षपातीपणे व्हावी एवढीच इच्छा आहे.’

दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) कवळेकर यांना अंतरिम जामीन देताना हा जामीन पुढे का चालू ठेवू नये यावर तपास यंत्रणेने सोमवारपर्यंत आपले मत सादर करावे, असे बजावले आहे त्यामुळे पोलीस सोमवारी काय भूमिका घेतात पाहावे लागेल. 

यापूर्वी याच प्रकरणात एसीबीने कवळेकर यांना मागच्या सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, विधानसभा अधिवेशन तोंडावर आल्याने त्याची तयारी करण्यासाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ पाहिजे असे कारण देऊन कवळेकर यांनी चौकशीला येण्याचे टाळताना अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला चौकशीसाठी बोलवावे, अशी मागणी केली होती. 

याआधी निवासस्थानीही छापा 

या प्रकरणात एसीबीच्या अधिका-यांनी याआधी कवळेकर यांच्या बेतुल येथे निवासस्थानी, केपे कार्यालयात तसेच मडगांव येथील त्यांच्या आस्थापनांच्या मुख्य कार्यालयात छापे टाकले होते. औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना १ जानेवारी २00७ ते ३0 एप्रिल २0१३ या कालावधीत कवळेकर यांनी बेहिशेबी मालमत्ता केल्याचा आरोप आहे. केरळ येथे खरेदी केलेल्या १४ वेगवेगळ्या मालमत्तांबाबतची माहिती त्यानी लपविल्याचाही आरोप आहे. पोलिसांना काही गोष्टींची समाधानकारक उत्तरे न दिल्यानेच त्यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. 

Web Title: Goa : Opposition Leader Babu Kawalekar's 3 hours inquiry by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा