गोव्यात डिसेंबरमध्ये होणार इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव; ईडीएमवर थिरकणार पर्यटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:18 AM2017-10-24T10:18:17+5:302017-10-24T10:19:11+5:30
गोव्यातील नाईट लाईफला वेगळी झळाळी मिळवून देणारा आणि पर्यटन व्यवसायाला अधिक आक्रमक व व्यापक बनवणारा इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यास मान्यता द्यावी असे सरकारने निश्चित केले आहे.
पणजी - गोव्यातील नाईट लाईफला वेगळी झळाळी मिळवून देणारा आणि पर्यटन व्यवसायाला अधिक आक्रमक व व्यापक बनवणारा इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यास मान्यता द्यावी असे सरकारने निश्चित केले आहे.
येत्या डिसेंबरमध्ये एकूण दोन इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव तथा ईडीएम आयोजित करण्यासाठी ईडीएम कंपन्यांनी अर्ज केले आहेत. एक आयोजक कंपनी गुजरातमधील आहे.
गोव्यात दरवर्षी होणाऱ्या ईडीएममध्ये लाखो पर्यटक भाग घेतात. काही वेळा काही पर्यटक अमली पदार्थाचे सेवन करून नृत्य करतात व त्यामुळे ईडीएमच्या आयोजनाला गोव्यातील काही घटकांनी विरोधही केलेला आहे. मात्र यावेळी ड्रग्जचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी व ईडीएमच्या आयोजनासाठी मान्यता द्यावी असे शासकीय पातळीवर तत्वत: ठरले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या ईडीएममध्ये अखंडीतपणे मोठ्या आवाजातील संगीताच्या तालावर पर्यटक बेभान होऊन नृत्य करत असतात. यापूर्वी सनबर्न व सुपरसोनिक असे ईडीएम पार पडले. यावेळी पुणे येथे सनबर्न होत आहे. गोव्यात येत्या दि. 27 डिसेंबरपासून ईडीएम आयोजित करण्यासाठी टाईम आऊट 72 आणि अन्य एका कंपनीने अर्ज केला आहे.
गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील सरकारी समितीने एका आयोजक कंपनीच्या प्रतिनिधींना सोमवारी बोलावून घेतले व तुम्ही ईडीएमच्या आयोजनाची तारीख तेवढी बदला अशी सूचना त्यांना केली आहे. एकाच वेळी दोन ईडीएम आयोजित न करता डिसेंबरमध्येच वेगवेगळ्या तारखेला ईडीएम आयोजित केले जावेत अशी सरकारची भूमिका आहे. एकाचवेळी दोन ईडीएम आयोजित केले गेले तर गोव्याच्या किनारी भागातील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो व ईडीएम आणि सरकार मग गोमंतकीयांच्या टीकेला पात्र ठरते. गोव्यातील वादांमुळेच सनबर्न ईडीएम यंदा गोव्याऐवजी पुणे येथे होत आहे.