Goa: शेतकऱ्यांवरील दडपशाहीचा आयटककडून पणजीत निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 03:37 PM2024-02-23T15:37:00+5:302024-02-23T15:37:34+5:30
Goa News: अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ची गोवा राज्य समितीने २१ रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी आणि शंभू सीमेवर हरियाणा पोलिस आणि केंद्रीय सैन्याने शेतकऱ्यांवर केलेल्या दडपशाहीचा तसेच एका युवा शेतकऱ्याचा झालेल्या दुःखद मृत्यूचा तीव्र निषेध केला.
- नारायण गावस
पणजी - अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ची गोवा राज्य समितीने २१ रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी आणि शंभू सीमेवर हरियाणा पोलिस आणि केंद्रीय सैन्याने शेतकऱ्यांवर केलेल्या दडपशाहीचा तसेच एका युवा शेतकऱ्याचा झालेल्या दुःखद मृत्यूचा तीव्र निषेध केला. या संघनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे शुक्रवारी पणजी आझाद मैदानावर हा निषेध करण्यात आला.
शेती विषयक धोकादायक असलेले कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी ते दिल्लीत जाऊ इच्छितात हाच त्यांचा दोष होता. यामुळे त्यांच्यावर प्लॉस्टीक गोळ्या आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्याच्या आधारावर त्यांनी दिल्ली सीमेवरून निषेध उठवला. केंद्रातील सत्ताधारी सरकार विरोधकांना चिरडण्यासाठी सर्व मार्ग वापरत आहेत आणि सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कृतींचा वापर करतात, असे आयटकचे नेते ॲड. राजू मंगेशकर म्हणाले.
ॲड. राजू मंगेशकर म्हणाले, आम्ही संघटित आणि असंघटित सर्व क्षेत्रांना २३ फेब्रुवारी हा काळा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन करतो आणि केंद्र सरकारच्या देशातील कामगार आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या निर्दयी वागणुकीबद्दल संताप व्यक्त करतो. आयटक गोवा आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरीत निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारला आवाहन करत अहोत.