Goa: पेडणे झोनिंग प्लॅन रद्दच, प्लॅनबाबत आणखी चर्चा नको, विश्वजीत राणे यांनी केलं स्पष्ट
By किशोर कुबल | Published: October 13, 2023 03:20 PM2023-10-13T15:20:35+5:302023-10-13T15:21:06+5:30
Vishwajit Rane: पेडणे झोनिंग प्लॅन अस्तित्वातच नाही. तो कायमचा रद्द झालेला आहे, अशी घोषणा नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. ते म्हणाले की 'लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय झोनिंग प्लॅन तयार केला जाणार नाही.
- किशोर कुबल
पणजी - पेडणे झोनिंग प्लॅन अस्तित्वातच नाही. तो कायमचा रद्द झालेला आहे, अशी घोषणा नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. ते म्हणाले की 'लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय झोनिंग प्लॅन तयार केला जाणार नाही. विश्वजीत म्हणाले की, लागवडीखालील जमिनींमध्ये जी घरे आहेत ती सर्व घरे सरकार वाचवणार आहे तसेच स्थानिकांशी सल्ला- मसलत केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.'
विश्वजीत राणे म्हणाले की, ' काहीजण लोकांची दिशाभूल करून चिथावणी देत आहेत. हे योग्य नव्हे. पेडणे झोनिंग प्लॅन रद्द झालेला असून तो आता अस्तित्वात नाही. केंद्र सरकारने मोपा विमानतळ आणि आयुष इस्पितळ असे दोन मोठे प्रकल्प पेडणेवासियांना दिले. पेडणेच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. आजवर पेडणे तालुक्यात लागवडीखालील जमिनींमध्ये जी घरे होती, ती सेटलमेंट झोनमध्ये आणण्याचे काम कोणीही केले नाही. आम्हीही घरे वाचवणार आहोत. हा माझा शब्द आहे.'
विश्वजीत म्हणाले की, 'झोन प्लॅन रद्द झाल्याने आता त्याबाबत आणखी चर्चा नको. मी हा प्लॅन तूर्त बाजूला ठेवला आहे. पेडणे तालुक्याला विकासाची गरज आहे. कालांतराने प्लॅन तयार करायचा झाला तर लोकांमध्ये जाईन, त्यांच्या सूचना मते जाणून घेईन तसेच सल्लागारांकडून त्यांची मते घेईन. झोनिंग प्लॅनच्या बाबतीत यापुढे कोणीही राजकारण करू नये. पेडण्याच्या लोकांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. जनतेचा आवाज हा सर्वात बुलंद आवाज हे सरकारला ठाऊक आहे.
या झोनिंग प्लॅनवरून गेले काही दिवस मोठा वाद निर्माण झाला होत. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी प्लॅन रद्द न केल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, पेडणेतील जनतेच्या भावनांचा आदर करून सरकारने प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली.