गोव्यात उच्च शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 35 टक्के; देशात दहाव्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 02:49 PM2019-09-24T14:49:44+5:302019-09-24T14:50:01+5:30
उच्च शिक्षणामध्ये गोव्यातील 18 ते 23 वयोगटातील मुलींचे प्रमाण 35 टक्के असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षणाच्या 2018- 19 च्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
पणजी: उच्च शिक्षणामध्ये गोव्यातील 18 ते 23 वयोगटातील मुलींचे प्रमाण 35 टक्के असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षणाच्या 2018- 19 च्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. गेल्या सहा वर्षांच्या काळात टक्केवारी सुमारे 4 टक्क्यांनी वाढली असली तरी राष्ट्रीय स्तरावर एकूण राज्ये आणि संघप्रदेशांमध्ये गोव्याचे स्थान दहावे आहे. 2013-14 मध्ये याबाबतीत गोवा आठव्या क्रमांकावर होता.
गोव्यातील असंख्य मुली पुणे येथे उच्च शिक्षणासाठी असल्याने पालकांचा पुणे येथे घर खरेदीकडे मोठा कल आहे. पुण्यातील एका बिल्डरने सांगितले की, कोथरूड, सिंहगड रोड, सातारा रोड, बाणेर रोड आदी भागात गोव्यातील लोकांचा सदनिका खरेदी करण्याचा कल जास्त आहे. कारण या ठिकाणहून गोव्यात येण्यासाठी लवकर एक्झीट मिळते. गोव्यातील अनेक लोक पुण्यामध्ये प्रॉपर्टीत गुंतवणूक करू लागले आहेत. तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर या ठिकाणचे पालकही पुण्यात घर किंवा सदनिका शोधत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मुले दहावी- बारावीत पोचण्याआधीच पुण्यात घर खरेदीसाठी चौकशी सुरू होते. पालकांना साधारणपणे बुकिंग केल्यानंतर दोन वर्षांत घराचा किंवा सदनिकचा ताबा हवा असतो अनेकजण हिंजेवाडी,खराडी आधी आयटी परिसराची निवड करतात. उच्च शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे . साधारणपणे प्रत्येक महिन्याला 12000 कुटुंबे पुण्यात स्थलांतरित होत असल्याचे समोर आले आहे.
पुण्यात आयटी तसेच ऑटोमोबाइल क्षेत्रात भरपूर वाव आहे येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर मुले नोकरी-व्यवसायासाठी पुण्यातच स्थायिक होतात त्यांच्यासाठी पालक गुंतवणुकीची तयारी करतात. सर्वेक्षणामध्ये गोव्यात उच्च शिक्षणाच्या बाबतीत मुलींचे प्रमाण कमी दिसण्याचे हेही एक कारण असू शकते असे मत काही जणांनी व्यक्त केले.