गोवा पर्यटन क्षेत्रात अग्रणी: मुख्यमंत्री सावंत, ग्रामीण पर्यटनाला देणार विशेष चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2024 08:59 AM2024-03-03T08:59:30+5:302024-03-03T08:59:54+5:30
राज्यातील समुद्रकिनारे फुल झालेले असताना आता ग्रामीण पर्यटन वाढवणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली :गोवापर्यटन क्षेत्रात अनेक नवे बदल घडवत असताना ग्रामीण भागात पर्यटनाला विविध माध्यमांतून चालना देण्याची गरज आहे. आरोग्य, अध्यात्म, वॉटर स्पोर्टस् व इतर माध्यमांतून ग्रामीण भागात पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सर्वराज इको फॉर्मच्या गोवा अॅक्वा वर्ल्ड या वॉटर अॅडव्हेंचर पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार डॉ. दिव्या राणे, आमदार प्रेमेंद्र शेट, रती गावकर, रमापती पित्रे, नरेश सावळ, महेश कांदोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील समुद्रकिनारे फुल झालेले असताना आता ग्रामीण पर्यटन वाढवणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. गावात नवे उद्योग येणे गरजेचे असून, त्याला सर्वांनी सहकार्य द्यावे, त्यामुळे आर्थिक उन्नती व रोजगार संधी उपलब्ध होतील, असे सांगितले.
सरकार ग्रामीण पर्यटनाला पुढे येत असेल, तर सिंगल विंडो माध्यमातून व सर्व ते सहकार्य करण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. गोव्याचा पर्यटन उद्योग मोठी संधी देणारा असून, त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन केले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ग्रामीण भागात तिघांनी नवे धाडस करताना वॉटर स्पोर्ट्स सुरू करून रोजगार व उद्योगाला चालना मिळणार आहे. पर्यटन खात्याने पर्यटन क्षेत्रात विशेष योजना राबवताना कला संस्कृतीला चालना देणे, गावातील नैसर्गिक पर्यटनाला चालना देणे, होम स्टेसाठी योजना हाती घेणार अनेक आधुनिक सुविधा देणे, तसेच पर्यटकांना गोव्याची खरी ओळख निर्माण करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगितले.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी ग्रामीण पर्यटनाला राज्यात मोठी संधी असून, मये पर्यटन केंद्राचा आधुनिक विकास साधणार असल्याचे सांगितले. आमदार डॉ. दिव्या राणे यांनी ग्रामीण भागात पर्यटनाला मोठी संधी मिळणे गरजेचे असून, मोठे प्रकल्प आले की विकास व रोजगाराला चालना मिळणार असल्याचे सांगितले.
स्वागतपर भाषणात ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने सहकार्य करताना रोजगार, तसेच आर्थिक क्रांती घडवणे शक्य आहे. हे फार्म खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष यशस्वी ठरेल, असे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.