पोलिसांचं काम बारकाईनं पाहणाऱ्याला घेतलं ताब्यात अन् उघड झाला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 07:23 PM2020-02-03T19:23:17+5:302020-02-03T19:24:46+5:30
दारु देण्यास नकार दिल्याने गोव्यात दोघांचा निर्घृण खून; संशयित गजाआड
मडगाव : दारुची मागणी केली असता, ती देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या एका तरुणाने दोघांचा खून करण्याची खळबळजनक घटना गोव्यातील फातोर्डा येथील एसजीपीडीए मार्केटजवळ घडली. फातोर्डा पोलिसांनी या खून प्रकरणाचा शिताफीने तपास करताना अर्जुन मारुती काजिदोनी (३0) याला अटक केली. संशयित माडेल येथे रहात असून, तो मूळ कर्नाटकातील असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. रवी (२0) व भीम (३0) अशी मृतांची नावे असून, झटापटीत सुनील सावंत (४५) हा इसम जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल केले आहे. संशयिताने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
भारतीय दंड संहितेंच्या ३0२ व ३0७ कलमाखाली अर्जुन काजिदोनीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. बारा तासाच्या आत खुनाचा गुंता सोडविणाऱ्या पोलीस पथकाला पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी पंचवीस हजारांचे इनाम जाहीर केले आहे.
दक्षिण गोवा विकास प्राधिकरणाच्या मार्केटजवळ असलेल्या ब्लेंसिंग पायोनियर कॉम्पलेक्स इमारतीतील वालंकणी बारच्या बाहेर सोमवारी मध्यरात्री खुनाची ही घटना घडली. बंद बारच्या बाहेर रात्री रवी, भीम व सुनील हे दारु पिऊन बसले होते. यावेळी अर्जुन तेथे आला. त्याला दारु पाहिजे होती. मात्र बार बंद होता. भीमा याच्या जवळ दारु होती. ती त्याने मागितली असता, नकार मिळाल्याने संतापलेल्या अर्जुनने या तिघांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. नंतर वाद विकोपाला गेला व अर्जुनने भीमा याच्या डोक्यावर दगड घातला, तर रवी व सुनील यांच्यावर फुटलेल्या बाटल्याने वार केले. यात भीमा व रवी हे दोघेही जागीच ठार झाले, तर सुनील हा रक्ताच्या थारोळयात जखमी होऊन तेथेच पडला. नंतर संशयित घटनास्थळाहून निघून गेला. मृतांपैकी रवी हा कार धुण्याचे तर भीम व सुनील हे दोघेही भंगार गोळा करण्याचे काम करत होते. मृत व संशयित हे परिचयाचे होते अशी माहितीही पोलिसांनी दिली.
सोमवारी सकाळी घटनास्थळी दोघे जण मृतावस्थेत तर एक जण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबधितांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला व खुनाचा शोध घेण्याचे काम सुरु केले.
उपअधिक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई, कपील नायक, मेल्सन कुलासो, उपनिरीक्षक अनंत गावकर, प्रशाल देसाई, अमिन नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक सुमेधा नाईक, हवालदार नरेंद्र साळगावकर, संजय देसाई, पोलीस शिपाई अविनाश नाईक, गोरखनाथ गावस, बबलू झोरे, सुधीर तळेकर, नागराज बांदेकर व रोहन नाईक यांच्या पथकाने शोधकामास सुरुवात केली. दुपारी पोलीस निरीक्षक रविंद्र देसाई व अविनाश नाईक हे एसजीपीडीएच्या मासळी मार्केटजवळ तपास करताना एक व्यक्ती खुनाच्या ठिकाणी पोलिसांचे सुरु असलेले काम बारकाईने न्याहाळत असल्याचे त्यांना दृष्टीस पडले. संशय बळावल्याने अविनाश नाईक यांनी या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अर्जुन काजिदोनी असे त्याचे नाव असून, त्यानेच हा खून केल्याचे उघड झाले. मागाहून त्याला रितसर अटक करण्यात आली.