गोवा : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कळंगुट किना-यावर पोलीस बुथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 11:58 AM2017-11-17T11:58:36+5:302017-11-17T11:59:36+5:30

समुद्र किना-यावरील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच किना-यावर आनंद लुटण्यासाठी येणा-या पर्यटकांना तसेच लोकांना सहकार्य व सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने कळंगुट किना-यावर पोलीस बुथची उभारणी करण्यात येणार आहे. 

Goa: Police booth for tourist safety | गोवा : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कळंगुट किना-यावर पोलीस बुथ

गोवा : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कळंगुट किना-यावर पोलीस बुथ

Next

म्हापसा - समुद्र किना-यावरील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच किना-यावर आनंद लुटण्यासाठी येणा-या पर्यटकांना तसेच लोकांना सहकार्य व सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने कळंगुट किना-यावर पोलीस बुथची उभारणी करण्यात येणार आहे. 

सिकेरी, कांदोळी, कळंगुट ते बागापर्यंतच्या किना-यावर चार बुथ कार्यान्वित करण्यात येणार असून त्यातील पहिल्या बुथचे उद्घाटन उपसभापती तसेच कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या हस्ते शनिवार (18 नोव्हेंबर) करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत कळंगुटचे सरपंच अ‍ॅन्थोनी डिसोझा तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बुथला जोडून किना-यावर पोलिसांना बसून देखरेख करण्यासाठी छत्र्यासुद्धा लावण्यात येणार आहे. 

जगप्रसिद्ध अशा या किना-यावर पर्यटकांची तसेच लोकांची वर्दळ सततची सुरूच असते. त्यातील बरेच पर्यटक नव्याने आलेले असतात. तर काही पर्यटक विदेशी असतात. येणारे पर्यटक आपल्या मौल्यवान व किंमती वस्तू किना-यावर ठेऊन आंघोळीसाठी समुद्रात जातात. उघड्यावर असुरक्षीतपणे ठेवलेल्या सामानाची नंतर चोरी होण्याचे प्रकार घडतात. काहींना हेरून त्यांची फसवणूक करण्यासाठीदेखील बरेच जण टपून बसलेले असतात. घडलेल्या गुन्ह्याची तक्रार नंतर कुठे नोंद करावी याची जाण नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तक्रारीची नोंद केली जात नाही. तसेच किना-यावरुन पोलीस स्थानकाचे अंतर दोन किलोमीटरपर्यंत असल्याने तेथे जाऊन तक्रार नोंदवणे सोयीस्कर ठरत नसते. 

या बुथसंबंधी माहिती देताना लोबो यांनी लोकांच्या तसेच पर्यटकांच्या सहाय्यतेसाठी ते उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. लोकांची फसवणूक होऊ नये त्यांना त्रास होऊ नये हा त्या मागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी या बुथवर 24 तास सततपणे पोलिसांचा पहारा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. लोकांचे हित लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी त्यांना सेवा व सुरक्षा उपलब्ध व्हावी या उद्देशाने तो घालण्यात आल्याचे सांगितले. एखादा गुन्हा घडल्यानंतर लोक पोलिसांच्या सहकार्याची अपेक्षा धरतात. त्यांच्या दृष्टीक्षेपात अशा प्रकारचे केंद्र उपलब्ध झाल्याने त्यांनाही त्याचा बराच फायदा होईल. तसेच जवळच पोलिसांचा बुथ असल्याने आपोआप गुन्हेगारांवर वचक बसेल अशी माहिती दळवी यांनी दिली. 

कळंगुट किनारपट्टीला जोडून असलेल्या इतर तीन किना-यांवरदेखील अशा बुथांची उभारणी लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी गृह खात्याची मंजूरी घेण्याची प्रस्ताव पाठवण्यात आला असून सदर प्रस्तावाला मान्यता लवकर लाभल्यास नाताळ सणापर्यंत ते कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Goa: Police booth for tourist safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.