गोवा: कारच्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबलने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 06:17 PM2024-01-01T18:17:21+5:302024-01-01T18:17:37+5:30
उल्हास गावकर हे फोंडा पोलीस स्थानकामध्ये सध्या कार्यरत होते.
नगरगाव : सत्तरी तालुक्यातील ठाणे - वाळपई मुख्य रस्त्यावर हनुमान विद्यालयाजवळ एका कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरून ड्युटीवर निघालेल्या पोलिस कॉन्स्टेबल उल्हास गावकर (रा. डोंगुर्ली -ठाणे) यांचा मृत्यू झाल्या. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातल्यामुळे संपूर्ण डोंगुर्ली - ठाणे गावावर शोककळा पसरली. अपघातप्रकरणी कारचालक गजानन नाईक (रा.देसाईवाडा ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे.
उल्हास गावकर हे फोंडा पोलीस स्थानकामध्ये सध्या कार्यरत होते. सकाळी ते स्वतःच्या मोटरसायकलने फोंडा पोलीस स्थानकामध्ये आपली ड्युटी बजावण्यासाठी जात होते. परंतु नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच होते. हनुमान विद्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीची धडक कारशी झाली. देसाईवाडा-ठाणे येथील गजानन नाईक (३०) हे कार घेवून जात होते. उल्हास अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ वाळपई सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मोटरसायकलचा चक्काचूर झाला. पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेला कारचालक गजानन नाईक याला अटक केली.