गोवा पोलिसांना मिळाले तपासाचे नवीन तंत्र, पहिलाच प्रयोग यशस्वी सिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:33 PM2018-10-20T21:33:39+5:302018-10-20T21:33:52+5:30
महिलेवर बलात्कार करून खून करण्याच्या जुने गोवा येथील अघोरी गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गोवा पोलिसांनी आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
- वासुदेव पागी
पणजी - महिलेवर बलात्कार करून खून करण्याच्या जुने गोवा येथील अघोरी गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गोवा पोलिसांनी आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या प्रकरणात पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्त्य यांनी विशेष रस घेताना २८ तपास पथके नियुक्त करून वेगळ््या पद्धतीच़्या तपास तंत्राचा वापर यावेळी केला, आणि हे तंत्र यशस्वी सिद्ध झाले आहे. त्यामुळे यापुढील सर्व महत्त्वाची प्रकरणे याच तपास तंत्राने हाताळली गेली तर गुन्हेगारीवर चाप बसविण्यासाठीही ते प्रभावी सिद्ध होवू शकते.
महिलेवरील खून प्रकरणात गुन्हा नोंदविला गेल्यापासून गुन्हेगार सापडेपर्यंत जो तपासाचा धडाका लावण्यात आला त्यात शंभराहून अधिक पोलीस कामाला लागले होते. तपास कामाच्या एका नवीन तंत्राची ओळख करून देताना उपमहानिरीक्षकानीं २६ पथके नियुक्त केली. एका पथकाची संख्या दोन वरून चार सदस्यांपर्यंत होती. प्रत्येक पथकाला वेगवेगळी कामे म्हणजेच २८ पथकांना २८ लक्ष्ये देण्यात आली होती. म्हणजेच तपासाची सुरूवातच सर्व शक्यता लक्षात घेऊन त्या अनुशंगाने करण्यात आली होती. गुन्हा जुने गोवा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आला असला तरी जिल्हा पोलीस अणि गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीसांनाही तपास कामात गुंतविण्यात आले होते. काहींना त्या भागातील इमारतीत असलेल्या सीसीटीव्हींची विशेशत: तेथील रस्त्यावरील वाहतूक टीपणारी फुटेज तपासण्याचे काम, काही पथकांना केवळ वैद्यकीय बाजू पाहाण्याचे काम, काहींना आजूबाजूच्या दुकांने, मद्यालये, घरे व आस्थापने यांना भेट देऊन युवतीची माहिती घेण्याचे काम देण्यात आले होते. अशा वेगवेगळ््या २८ कामांची सूचीच महानिरीक्षक घेऊन आले होते. दोन दिवसात मिळून २०० हून अधिक लोकांना पोलिसांनी संशयावरून पोलीस स्थानकात आणले होते. तपासाची चाळण लावता लावता नेमका संशयितही त्यातच सापडला गेला व त्याने गुन्हाही कबूल केला.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक कुणी तरी साहेब सांगतो आणि इतर लोक ऐकतात असेही या तपासाच्या बाबतीत घडले नव्हते. अगधी कॉन्स्टेबलचीही सूचना लक्ष्यवेधी वाटली तरी ऐकली जाईल याचा विश्वासही देण्यात आला होता. काही ज्येष्ठ अधिकाºयांच्या हे पचनी पडले नव्हते पण त्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. ठराविक वेळानंतर सर्व पथकांच्या कामाचा आढावाही घेतला जात होता. यामुळेच केवळ दोन दिवसात खुन्याला पकडण्यास यश मिळाले.
उपमहानिरीक्षकांच्या या नव्या तंत्राच्या बाबतीत काही एक दोन ज्येष्ठ अधिकारी अनुकूल नसले तरी काही पोलीस निरीक्षकांनी लोकमतशी बोलताना हे अत्यंत प्रभावी तंत्र असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. इतर बाबतीत आपण पहातो की तपास अधिकारी बिचारा एक दोन कॉन्स्टेबलना घेऊन काम करीत असतो आणि बाकीच्यांना काहीच देणंघेणं नसते. डीआयजीच्या नवीन तंत्रात मोठे टीमवर्क आहे आणि ते प्रभावीही आहे असे त्यांनी सांगितले.