तोतया मंत्र्याचा माग घेण्यासाठी गोवा पोलीस लखनौला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 03:18 PM2020-01-11T15:18:59+5:302020-01-11T15:19:34+5:30
- सुशांत कुंकळयेकर मडगाव: उत्तर प्रदेशचा सहकार मंत्री अशी बतावणी करुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह आजी—माजी मंत्र्यांना शेंडी ...
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: उत्तर प्रदेशचा सहकार मंत्री अशी बतावणी करुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह आजी—माजी मंत्र्यांना शेंडी लावणारा व त्यामुळे सध्या पोलिसांचा पाहूणचार घेणाऱ्या लखनौच्या सुनिल कुमार सिंग (48) या तोतया मंत्र्याचे एक एक किस्से सध्या गोव्याच्या प्रसार माध्यमात गाजत असून या तोतयाचा आगा पिछा शोधून काढण्यासाठी गोवा क्राईम ब्रँचचे एक पथक सध्या लखनौला रवाना झाले आहे.
स्वत:ला उत्तर प्रदेशातील मंत्री म्हणणारा सुनिल सिंग क्रिसमसच्या मुहूर्तावर आपल्या अन्य तीन साथीदारांबरोबर गोव्यात आला होता. एका बनावट मेलद्वारे त्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर त्याचा शाही पाहूणचार करण्यात आला होता. त्याच्या दिमतीला एक आलीशान गाडी आणि संरक्षणासाठी पोलीसही तैनात करण्यात आला होता.
गोव्यातील विविध सहकारी संस्थांना भेट देतानाच त्यांनी गोव्याचे सहकार मंत्री गोविंद गावडे व माजी सहकार मंत्री प्रकाश वेळीप यांचीही भेट घेतली होती. प्रकाश वेळीप यांच्या सहकारी संस्थेला दहा कोटी रुपयांची मदत करण्याचेही त्याने जाहीर केले होते. या संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी हा तोतया प्रमूख पाहुणा म्हणूनही उपस्थित राहिला होता.
दरम्यानच्या काळात दारुच्या नशेत असताना आपल्याला मालिश करण्यासाठी मुली आणून द्या अशी मागणी सरकारी विश्रमधामाच्या अधिकाऱ्याकडे केल्यानंतर त्याचा संशय आल्याने इंटरनेटवर त्याची माहिती शोधून काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी सुनिल कुमार सिंग नावाचा कुठलाही मंत्री उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात नाही हे दिसून आले होते. त्यानंतर गोवापोलिसांनी त्या चौघानाही चतुभरूज केले होते.
सध्या हे चारही तोतये क्राईम ब्रँचच्या कोठडीत आहेत. क्रिसमसच्या काळात गोव्यात फुकट रहायला मिळावे यासाठीच या तोतयाने हा बनाव बनविला होता. मात्र त्यामुळे गोवा सरकारची संपूर्ण इज्जत जाऊन सगळीकडे शिथू झाले होते.