'त्या' तरुणाला पट्ट्यानं बेदम मारहाण करणाऱ्या पाच पोलिसांची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 03:41 PM2018-11-27T15:41:08+5:302018-11-27T15:41:28+5:30

मडगावचे उपअधीक्षक राजू राऊत देसाई चौकशी अधिकारी

goa police ordered interdepartmental inquiry in youth beaten case | 'त्या' तरुणाला पट्ट्यानं बेदम मारहाण करणाऱ्या पाच पोलिसांची चौकशी होणार

'त्या' तरुणाला पट्ट्यानं बेदम मारहाण करणाऱ्या पाच पोलिसांची चौकशी होणार

Next

मडगाव: क्षुल्लक कारणावरुन बेतूल येथील क्लीन्ट रिबेलो या तरुणाला चामड्याच्या पट्ट्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर झाला आहे. यामुळे पोलिसांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. कुंकळ्ळी पोलिसांच्या या कथित कृतीवर टीकेचा भडिमार झाल्यानंतर आता या संपूर्ण घटनेची चौकशी होणार आहे. मडगावचे उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांची या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते मारहाणीचा आरोप असलेल्या पाच पोलिसांची चौकशी करतील.

मारहाण प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांना दिले आहेत. क्लीन्ट रिबेलोला रविवारी सायंकाळी पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप आहे. एका अपघात प्रकरणात सगळी वाहने अडवून ठेवल्यामुळे या तरुणानं पोलिसांना वेड्यात काढून तशी शेरेबाजी केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला सरकारी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच फातोर्डामधील नेहरु स्टेडियमवर आयएसएल सामन्यानंतर लेस्टर डिसोझा या तरुणाला आयआरबी पोलिसांकडून मारहाण झाली होती. या घटनेच्या चौकशीची जबाबदारीही राऊत देसाई यांच्याकडेच होती. एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर डिसोझा याला झालेल्या मारहाणीसंदर्भात आयआरबीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तप्रसाद तोरस्कर व रौनक कदम यांची खात्याअंतर्गत चौकशी चालू आहे. या उपनिरीक्षकांना खात्याकडून दोषारोपपत्र देण्यात आले असून त्या दोघांनीही आपली बाजू सादर करावी असं त्यात म्हटलं आहे. या मारहाणीच्या प्रकरणात मडगावचे उपअधीक्षक राऊत देसाई यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर आपला अहवाल सादर केला होता. या अहवालानंतर पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी ही चौकशी सुरु केली आहे.
 

Web Title: goa police ordered interdepartmental inquiry in youth beaten case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.