फरार अटालाला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलीस उत्तराखंडमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:49 PM2019-05-02T15:49:07+5:302019-05-02T15:56:51+5:30
गोव्यात एका रशियन नागरिकावर खुनी हल्ला करुन फरार झालेला कुप्रसिद्ध इस्रायली ड्रग डिलर यानीव बेनाईम उर्फ अटाला याला उत्तराखंड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी अंजुणा पोलिसांचे पथक उत्तराखंडात दाखल झाले आहे.
मडगाव - गोव्यात एका रशियन नागरिकावर खुनी हल्ला करुन फरार झालेला कुप्रसिद्ध इस्रायली ड्रग डिलर यानीव बेनाईम उर्फ अटाला याला उत्तराखंड पोलिसांनीअटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी अंजुणा पोलिसांचे पथक उत्तराखंडात दाखल झाले आहे. अटालाला गोव्यात आणून त्याच्या विरोधात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती अंजुणाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली.
दरम्यान, अटाला विरोधात उत्तराखंडातही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव केल्यामुळे गुन्हा नोंद झाला आहे. नेपाळात पळून जाण्याच्या तयारीत असताना इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटालाची अंमलीपदार्थ व्यवहारातील पार्श्वभूमी पाहून ड्रग्स डिलिंगसाठीच तो नेपाळात तर जात नव्हता ना याचीही उत्तराखंडचे पोलीस चौकशी करत आहेत.
मागची कित्येक वर्षे अंजुणा परिसरात बेकायदेशीर वास्तव करुन असलेल्या अटालाने 24 एप्रिल रोजी एडवर्ड नावाच्या एका रशियन नागरिकावर सुरी हल्ला केला होता. त्याच्या अन्य दोन साथीदारांनीही त्या रशियन नागरिकावर लोखंडी कांबीनी हल्ला केला होता. सध्या त्या रशियन नागरिकावर गोव्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार चालू आहेत.
या हल्ल्यानंतर आपल्याला अटक होणार या भीतीने अटाला फरार झाला होता. कदाचित तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता गृहित धरुन गोवा पोलिसांनी देशातील सगळ्या सीमावर्ती भागातील पोलिसांना सतर्क केले होते. मंगळवारी रात्री अटाला नेपाळात जाण्याच्या तयारीत असताना इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे कुठलीही वैध कागदपत्रे नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी केली असता गोव्यात आपल्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी अंजुणा पोलिसांना ही खबर दिल्यानंतर बुधवारी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले.
अटाला याचे नाव यापूर्वी गोव्यातील राजकारण्यांचे ड्रग्स व्यवसायात संबंध असल्याचे वक्तव्य केल्यामुळे सर्वप्रथम चर्चेत आले होते. यापूर्वी त्याला अंमलीपदार्थ विषयक गुन्हय़ात अटकही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने त्याला निदरेष मुक्त केले होते. त्यानंतर अटालाचे वास्तव्य गोव्यातच होते. हल्लीच एका स्थानिक जलक्रीडा चालकाकडेही वाद करुन अटालाने त्याच्या कामगारावर हल्ला केला होता. त्यानंतर रशियन नागरिकावर हल्ला केल्यामुळे पोलिसांच्या दफ्तरात अटालाच्या नावाची पुन्हा एकदा नोंद झाली होती.