डीजीपीनेच काढले गोवा पोलीसांच्या शिस्तीचे वाभाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 09:03 PM2017-12-20T21:03:47+5:302017-12-20T21:04:06+5:30
पोलीस खात्याच्या स्थापनेच्या दिवशीच पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पोलिसांच्या बेशिस्तपणाचे जाहीरपणे वाभाडे काढले.
पणजी: पोलीस खात्याच्या स्थापनेच्या दिवशीच पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पोलिसांच्या बेशिस्तपणाचे जाहीरपणे वाभाडे काढले. गचाळ संचालन, सदोष गणवेश आणि बेशीस्त वर्तनाबद्दल त्यांनी सर्वांना खडे बोल सुनावले आणि सुधारण्यासाठी तंबी दिली.
ताठ चालता का येत नाही? सलाम ठोकण्याची पद्धत ठाऊक नाही काय? गणवेशाची नामपाटी अशी लावतात काय? गणवेशात असले बूट घालतात का? असे एक नव्हे तर अनेक त्रुटी दाखवून पोलीस महासंचालकांनी पोलिसांची जाहीरपणे खरडपट्टी काढली. अधिकाºयांनाही त्यांनी सोडले नाही. महासंचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र स्विकारण्यासाठी जत्रेत चालल्यासारखा एक निरीक्षक चालत येत होता. त्याला केवळ खडसावून महासंचालक थांबले नाहीत तर त्याला चालणे शिकविण्याची सूचनाही त्याच्या अधीक्षकाला केली.
गोवा पोलीसाच्या ५७ व्या स्थापनादिनानिमित्त पोलिसांचे मुख्यालयाजवळच्या मैदानत संचालन झाले. संचलनात त्रुटी भरभरून जाणवत होत्या. बँडच्या तालावर पावले पडत होती, परंतु पावलात समानता नव्हती. देहबोली योग्य नव्हती, सर्वांचा गणवेश परीपूर्ण नव्हता, खुद्द महासंचालकांनी तर अधिकाºयांच्या गणवेशात त्रुटी दाखविल्या. एकाही प्लॅटूनच्या कमांडींग अधिकाºयाच्या आज्ञात दम नव्हता. मुख्य कमांडींग अधिकाºयांच्या आज्ञा दमदार होत्या परंतु आज्ञांचे पालन अचूकपणे होत नव्हते. महासंचालकांनी याबाबतीत तीव्र नापसंती व्यक्त केली. अपल्या भाषणातही त्यांनी त्याचा उल्लेख केला.
यावेळी कडक शिस्तीचा इशारा देताना मुक्तेश चंदर यांनी शिस्तीच्या बाबतीत खात्याकडून कडक धोरण ठेवले जाईल. शिस्तीच्या बाबतीत तडजोड नाही. पोलीस खाते हेशिस्तीचे खाते असल्यामुळे पोलिसांकडून या बाबतीत सतर्क असणे सक्तीचे आहे असे सांगितले.
शिस्तीच्या बाबतीत कठोर ताशेरे ओढतानाच पोलीस खात्याच्या कार्याची स्तुतीही त्यांनी केली. गुन्हयांचा तपास करण्याच्या बाबतीत खात्याकडून सरस कामगिरी बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खात्याचे वेर्णा येथील फॉरेन्सीक प्रयोगशाळाही पूर्णत्वाली असून त्यातील दोन विभाग हे पूर्णपणे सक्रीय झाल्याचे त्यांनी सांगितले. ही पूर्णपणे सुसज्ज झाल्यानंतर तपासकामे वेगात होणार असल्याचेही ते म्हणाले.