भाजपामध्ये फूट अटळ, गाभा समितीवरील तीन सदस्य आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 11:50 AM2018-11-14T11:50:25+5:302018-11-14T11:56:00+5:30
भाजपाने पक्षातील असंतुष्टांच्या हालचालींची दखल घेतलेली असली तरी, भाजपामध्ये फूट अटळ बनलेली आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे तीनही सदस्य आक्रमक आहेत.
पणजी - भाजपाने पक्षातील असंतुष्टांच्या हालचालींची दखल घेतलेली असली तरी, भाजपामध्ये फूट अटळ बनलेली आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे तीनही सदस्य आक्रमक आहेत. हे तिघेही भाजपाच्या गाभा समितीचे तथा कोअर टीमचे सदस्य आहेत पण त्यांना आता समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यामध्ये रस राहिलेला नाही, अशी माहिती मिळाली.
शिरोडा व मांद्रे विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षात फुट पडेल. पार्सेकर व महादेव नाईक हे पक्षात राहू शकणार नाहीत. भाजपालाही याची कल्पना आली आहे. महादेव नाईक यांनी शिरोड्यात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करणार असे जाहीरच केले आहे. पार्सेकर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना लक्ष्य बनवत मांद्रेमध्ये वेगळी रणनीती आखणे सुरू केले आहे. पार्सेकर यांच्याविरुद्ध कथित शिस्तभंगाची कारवाई करण्याची वेळ पक्षावर येऊ शकते, अशी चर्चा भाजपाच्या कोअर टीमच्या काही सदस्यांमध्ये सुरू आहे. भाजपाने पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांनाही डिसोझा, पार्सेकर, महादेव नाईक, मांद्रेकर यांच्या हालचालींविषयीची माहिती दिली आहे. मात्र या नेत्यांना त्याची पर्वा नाही. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक रामलाल किंवा अन्य कुणी आमच्यासोबत चर्चेला येतो का आम्ही पाहतो, मग पक्षात नेमके काय चालले आहे ते आम्ही त्यांना तपशीलाने सांगू, असे एका ज्येष्ठ सदस्याने लोकमतला सांगितले. आम्ही बंडखोर नेते नव्हे, असेही हे सदस्य म्हणाले.
भाजपाच्या कोअर टीमचे मांद्रेकर, पार्सेकर व डिसोझा हे सदस्य असले तरी, अलिकडे ते कोअर टीमच्या बैठकांनाही उपस्थित राहत नाहीत. डिसोझा यांनी तर आपल्याला कोअर टीमवर राहण्याची इच्छाच नाही असे यापूर्वी स्पष्ट केले आहे. भाजपाच्या कोअर टीममध्ये अशी फुट गेल्या वीस-पंचवीस वर्षात कधीच पडली नव्हती. माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, माजी मंत्री आदींना पक्षाचे काही निर्णय पसंत पडले नाहीत व त्यामुळे त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. आम्हाला पक्षात बदल व सुधारणा घडवून आणायच्या आहेत व त्यासाठीच आमचा संघर्ष आहे, असे कथित बंडखोरांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे स्वत: आजारी असल्याने मांद्रेकर किंवा पार्सेकर यांनी पर्रीकर यांच्यावर टीका केलेली नाही. पर्रीकर हेही पक्षातील सध्याच्या असंतोषाविरुद्ध काहीच करू शकत नाहीत. मांद्रेकर यांना अलिकडेच भाजपाने पक्षाच्या ओबीसी समितीचे प्रमुखपद दिलेले आहे. मात्र असंतुष्टांनी म्हापशात डिसोझा यांच्या निवासस्थानी गेल्या आठवड्यात घेतलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यापासून मांद्रेकर यांना भाजपा रोखू शकला नाही. अन्य काही सदस्यांना रोखण्यात भाजपाला यश आले. काहीजण पक्षाने दिलेल्या तंबीला घाबरले अशीही चर्चा सुरू आहे.