गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांसाठी तयारी वेगात; सरकारसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 12:28 PM2017-10-24T12:28:49+5:302017-10-24T12:29:36+5:30
लुसोफोनिया गेम्स, ब्रिक्स असे काही राष्ट्रीय आणि जागतिक किर्तीचे इव्हेन्ट्स यशस्वी करून दाखविल्यानंतर गोवा सरकारसमोर आता राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करून दाखविण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
पणजी- लुसोफोनिया गेम्स, ब्रिक्स असे काही राष्ट्रीय आणि जागतिक किर्तीचे इव्हेन्ट्स यशस्वी करून दाखविल्यानंतर गोवा सरकारसमोर आता राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करून दाखविण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी गोवा सरकारने येत्या 12 महिन्यात मोठ्या साधनसुविधा निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या आयोजनाचा विषय खूप गंभीरपणे घेतला आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनामध्ये गोवा राज्य कुठे कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सर्व संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना केली आहे. गोव्यात पाच वर्षांपूर्वी लुसोफोनिया स्पर्धा पार पडल्या तेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन स्टेडियम गोव्यात उभे राहिले. ब्रिक्स सोहळ्याप्रसंगी दक्षिण गोव्यातील पायाभूत साधनसुविधांमध्ये भर पडली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाप्रसंगी (इफ्फी) गोव्यात आयनॉक्स मल्टिप्लेक्स, पाटो येथे नवा पुल, मनोरंजन संस्थेसाठी कार्यालय, छोटी प्रेक्षागृहे, मोठे मिडिया सेंटर आणि अन्य सुविधा उभ्या राहिल्या. आता राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या आयोजनासाठी पर्रीकर सरकारकडे फक्त बारा महिन्यांचा कालावधी आहे.
गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा होऊ शकणार नाहीत, कारण या राज्यात त्यासाठीच्या आवश्यक सुविधा नाहीत अशा प्रकारचा प्रचार सर्वत्र होत असतानाच गोवा सरकारने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा आम्ही यशस्वी करून दाखवू असे ठरवले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी गोवा क्रिडा प्राधिकरणाची आमसभा पार पडली. गोव्यात कशा प्रकारे येत्या बारा महिन्यांत कोणत्या साधनसुविधा उभ्या केल्या जातील याची माहिती आमसभेसमोर ठेवण्यात आली.
पणजी-कांपाल येथे नवे टेबल टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट उभे केले जाणार आहेत. दक्षिण गोव्यातील फातोर्डा येथे टेबल टेनिस स्टेडियम बांधला जाणार आहे. या शिवाय साळगाव व कुडचडे येथे सायकल ट्रॅकिंगची सोय केली जाईल. फोडा, नावेली व अन्य काही ठिकाणी असलेल्या क्रिडाविषयक साधनसुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी त्यासाठी एकूण 230 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सध्या काही सुविधांची दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान गोवा क्रिडा प्राधिकरणाची आमसभा सोमवारी 23 रोजी पूर्ण होऊ शकली नाही. ती शुक्रवारी पुन्हा होणार आहे असे क्रिडा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.