घरात काम करणाऱ्या महिलेला ठेवलं कोंडून, सरकारी अभियोक्ताला ठोठावला 60 हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 07:59 PM2019-01-30T19:59:23+5:302019-01-30T20:02:12+5:30
घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कपाटात बंद करुन तिच्या जीवाला धोका पोहोचविल्याबद्दल गोव्यातील सरकारी अभियोक्ता लादिस्लाव फर्नांडिस यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
मडगाव- घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कपाटात बंद करुन तिच्या जीवाला धोका पोहोचविल्याबद्दल गोव्यातील सरकारी अभियोक्ता लादिस्लाव फर्नांडिस यांना दोषी ठरवण्यात आले आहे. शिवाय, मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने न्यायालय उठेपर्यंत शिक्षा आणि 60 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. बुधवारी (30 जानेवारी)ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दंड न भरल्यास संशयिताला तीन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संशयिताने या शिक्षेविरुद्ध सत्र न्यायालयात जाण्याचे अपील केल्यानंतर या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली. सत्र न्यायालयात जाण्यासाठी संशयिताला एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मडगावचे प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीक्ष राम प्रभुदेसाई यांनी हा निवाडा दिला. 28 जानेवारीला या खटल्याचा निवाडा होणार आहे. मात्र निवाडा तयार झालेला नसल्याने खटला पुढे ढकलण्यात आला होता.
मागच्या आठवडयात न्यायालयात शिक्षेवर शिक्षेवर अंतिम युक्तीवाद झाले. सरकारी वकील प्रीतम मोराईस यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा ठोठावी अशी मागणी केली होती. तर आरोपीच्यावतीने वकील ए. रिबेलो यांनी अंतिम युक्तीवाद करताना आपल्या अशिलाला सौम्य शिक्षा ठोठावी अशी मागणी केली होती. आपल्या अशिलाला सरकारी नोकरीतून निवृत्त होण्यास अवघे दीड वर्षे शिल्लक आहे. सरकारी नोकरीच्या कारकर्दीत त्यांना आतापर्यंत एकही मेमो आलेला नाही.
तो घरातील एकमेव कमवता आहे. तसेच त्याची दोन मुले त्यांच्यावर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना सौम्य शिक्षा ठोठवावी अशी मागणी केली. मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राम प्रभूदेसाई यांच्यासमोर 21 जानेवारीला हा अंतिम युक्तीवाद झाला. त्यापूर्वी 14 जानेवारी रोजी शिक्षेवर अंतिम युक्तीवाद करण्यासाठी संशयिताच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याने ही सुनावणी 21 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली होती.
घरात काम करणाऱ्या महिलेला कपाटात बंद करुन तिच्या जीवाला धोका पोहोचविल्या प्रकरणात फर्नांडिस याला भादंसंच्या 323 (दुखापत करणे), 341 (बळजबरीने अडवणूक करणे) आणि 346 (बंद जागेत कोंडून दुखापत करणे) या कलमाखाली दोषी ठरविण्यात आले आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फर्नांडिस यांनी आपल्या घरी एका अल्पवयीन मुलीला घरातील कामे करण्यासाठी ठेवले असल्याची तक्रार एका एनजीओकडून करण्यात आल्यावर पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी करण्यासाठी प्रयत्न केला असता संशयिताने त्या मोलकरणीला लोखंडी कपाटात घालून त्या कपाटाला चावी ठोकली होती. नंतर पोलिसांनी हे कपाट उघडायला लावून त्या मुलीची सुटका केली होती. दरम्यानच्या काळात सदर मुलगी अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाल अत्याचाराच्या गुन्ह्यातून फर्नांडिस याला मुक्त करण्यात आले होते. मात्र इतर गुन्ह्याखाली त्याच्यावर सुनावणी चालू होती.