गोव्याचे बांधकाम मंत्री इस्पितळात, नेते आजारी पडण्याची मालिका सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 03:41 PM2018-07-10T15:41:59+5:302018-07-10T15:42:38+5:30
ढवळीकर मुंबईतील एका खासगी इस्पितळात दाखल
पणजी : गोव्यातील राजकारणात गेली अनेक दशके स्वत:चे स्थान कायम टिकवून ठेवणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक (मगोप) या पक्षाचे प्रमुख नेते आणि पर्रिकर मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना मुंबईतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या काही चाचण्या केल्या जात आहेत.
ढवळीकर हे गोवा विधानसभेत निवडून आले. तीनवेळा ते गोव्याचे बांधकाम मंत्री बनले. ढवळीकर यांना मधूमेह आहे. चेन्नईच्या इस्पितळात ते तपासणीसाठी गेले होते. तिथून त्यांना काही चाचण्या करून घेण्यासाठी मुंबईच्या इस्पितळात पाठविले गेले. सुदिन यांचे बंधू तथा माजी मंत्री दिपक ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष आहेत. बांधकाम मंत्री ढवळीकर हे मुंबईच्या इस्पितळात असून येत्या रविवारपर्यंत ते गोव्यात परततील. त्यांच्या काही चाचण्या झाल्यानंतर ते येतील. यात गंभीर असे काही नाही असेही दिपक ढवळीकर लोकमतशी बोलताना म्हणाले. सुदिन इस्पितळात दाखल झाल्याचे वृत्त कळताच मगोपच्या गोव्यातील कार्यकर्त्यांमध्ये व ढवळीकर यांच्या समर्थकांमध्ये त्याविषयी चर्चा व चिंता सुरू झाली. सुदिन यांच्यासोबत त्यांचे डॉक्टर बंधू संदिप हे मुंबईला गेले आहेत.
दरम्यान, गेले काही महिने गोव्याचे मंत्री व आमदार लागोपाठोपाठ इस्पितळात दाखल होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे तीन महिने इस्पितळात उपचार घेऊन आले. अजुनही ते लोकांमध्ये जास्त मिसळत नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे त्यांनी खूपच मर्यादित केले आहे. येत्या महिन्यात ते पुढील तपासणीसाठी पुन्हा अमेरिकेतील इस्पितळात जाणार आहेत. गोवा मंत्रिमंडळातील वीज मंत्री तथा पांडुरंग मडईकर हे ब्रेन स्ट्रोकच्या धक्क्यानंतर गेला दीड महिना मुंबईच्या कोकिळाबेन इस्पितळात आहेत. भाजपचे आणखी एक आमदार कालरुस आल्मेदा यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने इस्पितळात रहावे लागले होते. आता त्यांची प्रकृती बरी आहे. ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही आजारी असून त्यांनाही अधूनमधून उपचार घ्यावे लागतात. काँग्रेसचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्यावर नुकतीच मूत्रपिंडाची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते प्रतापसिंग राणो हे गेल्या महिन्यात गोव्यातील गोमेकॉ या सरकारी इस्पितळात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती ठीक झाली.