राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यजमान पदासाठी गोवा सज्ज; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
By काशिराम म्हांबरे | Published: October 13, 2023 04:59 PM2023-10-13T16:59:39+5:302023-10-13T16:59:46+5:30
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सर्व पूर्वतयारी झाली असून, साधनसुविधा उभारण्याचे ९९ टक्के काम पूर्णत्वास आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यजमान पदासाठी गोवा सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्यात संपन्न होणाºया ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निमीत्त मुख्यमंत्र्यांनी म्हापशातील पेडे बहुउद्देशीय क्रीडा प्रकल्पांतील हॉकी मैदान तसेच इनडोर स्टेडियमची पाहणी करीत स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. या पाहणीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत क्रीडा मंत्री गोविंद गावडे, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, बार्देश उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी., तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सर्व पूर्वतयारी झाली असून, साधनसुविधा उभारण्याचे ९९ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित दोन दिवसांत मैदानांचे डीप क्लिनिंगचे काम केले जाईल. गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदाच राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत असून, गोमंतकीयांसाठी ही पर्वणी आहे. त्यामुळे सर्वांनी या राष्ट्रीय खेळ प्रकारांच्या मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी सरकारने कुठलीस कसर ठेवली असून, सर्व पूर्वतयारी झाली आहे. राष्ट्रीय खेळाचे आयोजन करताना बारीक-सारीक चूका राहू शकतात. कारण, मानवी चूकांची संभावना असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, पेडे क्रीडा प्रकल्पांत चार खेळांचे आयोजन केले असून यात हॉकी, बॉक्सिंग, बिडियर्स अँड स्नूकर तसेच जिम्नॅस्टिक प्रकार होतील. २३ आॅक्टोबरपासून येथे हे खेळ सुरू होणार आहेत.