गोवा : स्मार्ट सिटीत पुन्हा एकदा मिळाले प्राचीन मूर्तीचे अवशेष
By समीर नाईक | Published: May 2, 2024 03:45 PM2024-05-02T15:45:15+5:302024-05-02T15:45:29+5:30
स्मार्ट सिटीत मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. स्मार्ट सिटीची कामे करतानाच मूर्ती आणि अवशेष मिळत आहे, हे विशेष.
पणजी: स्मार्ट सिटीत पुन्हा एकदा पुरातन मूर्तीचे गुरुवारी अवशेष मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी पणजी चर्चस्क्वेअर येथील रित्झ हॉटेल जवळील भागात फूटपाथ बांधण्याचे काम सुरू असताना अडीच मीटर लांबीची पोर्तुगीज कालीन मूर्ती सापडली होती. याच ठिकाणी २० मीटरच्या आत गुरुवारी अशाच एका मूर्तीचा अवशेष सापडल्याने आता या भागाला महत्व आले आहे.
स्मार्ट सिटीत मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. स्मार्ट सिटीची कामे करतानाच मूर्ती आणि अवशेष मिळत आहे, हे विशेष. गुरुवारी मिळालेल्या मूर्तीचा अवशेष पुरातत्व खात्याने ताब्यात घेतले आहे. तसेच आता यापूर्वी आणि आज मिळालेल्या या मूर्तीवर अभ्यास करून नंतर याबाबत सविस्तर माहिती देणार आहे.
मंगळवारी मिळालेली मूर्ती ही इ.स १७५० पूर्वीची आहे, असा खुलासा इतिहास अभ्यासक संजीव सरदेसाई यांनी केला होता. गुरुवारी देखील जो अवशेष मिळाला आहे तो देखील याच काळातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसात आणखी काही अवशेष किंवा मूर्ती मिळू शकते असा अंदाजही आता लावण्यात येत आहे. त्यामुळे या कामाकडे आता सर्वांची नजर लागून राहिली आहे. कामगारांना देखील या गोष्टीची काळजी घेत काम करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे.