गोवा : रेंट ए कारना स्पीड गव्हर्नर बसवा, आमदार कार्लुस फेरेरा यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 04:20 PM2024-02-23T16:20:57+5:302024-02-23T16:21:05+5:30
वाढत्या अपघातांवर सरकारने आता योग्य दखल घेतली नाही तर कोर्टात जाणार असल्याचा इशारा कॉँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी दिला.
नारायण गावस
पणजी: राज्यात रेंट ए कारवाल्यांकडून अपघात वाढत आहेत तरी त्यांना स्पीड गव्हर्नर बसवलेले नाहीत. सरकार तसेच रेंट ए कार एजन्सीची सेटींग सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित करत वाढत्या अपघातांवर सरकारने आता योग्य दखल घेतली नाही तर कोर्टात जाणार असल्याचा इशारा कॉँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी दिला. गुरुवारी मांडवी पुलावर रेंट ए कारच्या धडकेने दुचाकी चालक थेट मांडवी नदीत पडला. यावर आमदारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमदार कार्लूस फेरेरा म्हणाले, रेंट ए कारमध्ये स्पीड गव्हर्नर नसल्याने चालक वेगाने गाड्या चालवितात. रेंट ए कार चालविणारे हे पर्यटक आहेत. त्यामुळे त्यांना राज्यातील रस्त्यांची योग्य माहिती नसते. तसेच बहुतांश पर्यटक हे रस्त्याच्या नियमांचे पालन करत नाही. यामुळे या गाड्यांवर स्पीड गव्हर्नर असणे गरजेचे आहे. फक्त दंड आकारुन चालणार नाही. तसेच काही पर्यटक हे अपघात करुन गाड्या घेऊन पळून जातात त्यामुळे रेंट ए कार एजन्सीने याची गंभीर दखल घ्यावी.
आम्ही कधीच ६० पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवित नाहीत. पण काही लोकांना रस्ते माहिती नसतात तरी वेगाने गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरतात. त्यामुळे आता सरकारने हे वाढते अपघात नियंत्रणात आणण्यास याेग्य दखल घ्यावी, असेही ॲड. फेरेरा म्हणाले.