गोव्यात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवा, मगोपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 01:14 PM2018-09-15T13:14:45+5:302018-09-15T13:15:16+5:30
मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा अशी स्पष्ट मागणी प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) शनिवारी येथे केली.
पणजी : मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा अशी स्पष्ट मागणी प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) शनिवारी येथे केली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमध्ये आहे.
मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने व त्यांना प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी आपल्याकडील बहुतांश खाती अन्य सर्व मंत्र्यांमध्ये वितरित करावी असे ठरवले आहे. मनोहर पर्रीकर हे दिल्लीला एम्स संस्थेमध्ये पुढील उपचारांसाठी निघण्यापूर्वी कांदोळी येथील इस्पितळात शनिवारी सकाळी सभापती प्रमोद सावंत आणि भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तिथे राजकीय स्वरुपाची चर्चा झाली. लोबो यांनी त्या भेटीनंतर लोकमतला सांगितले, की मनोहर पर्रीकर हे त्यांच्याकडील अतिरिक्त खाती मंत्र्यांमध्ये पुढील 48 तासांत वितरित करतील. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तसे सांगितले आहे. मनोहर पर्रीकर यांच्याकडे अर्थ, गृह या खात्यांसह उद्योग, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, वन, पर्यावरण, सहकार, पर्सनल, सर्वसाधारण प्रशासन अशी विविध खाती आहेत.
मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांना लोकमतने अतिरिक्त खाते वाटपाविषयी प्रतिक्रिया विचारली असता, ढवळीकर म्हणाले, की र्पीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा. सरकारचे काम सुलभपणे व चांगल्या प्रकारे चालावे म्हणून मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपविणो गरजेचे आहे.
ढवळीकर यांनी मगोपचे दुस-या पक्षात विलीनीकरण कोणत्याच अटीवर केले जाणार नाही असेही स्पष्ट केले. विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही असे ते म्हणाले. दरम्यान, मगोपचे नेते असलेले सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळात सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा सोपविण्यास गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांचा आक्षेप आहे, अशी माहिती राजकीय सुत्रांकडून मिळाली. मंत्री सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डकडे तीन आमदार असून त्या तिन्ही आमदारांकडे मंत्रीपदे आहेत. मगोपकडेही तीन आमदार असून त्या तीनपैकी दोघांकडे मंत्रीपदे आहेत.