सरकारचे कान टोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:28 AM2023-06-20T08:28:22+5:302023-06-20T08:28:52+5:30
क्रांतिदिन सोहळ्यात खुद्द स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या अध्यक्षांनीच टोचले.
'सोनाराने कान टोचले' अशी म्हण आहे. सरकारचे कान चक्क क्रांतिदिन सोहळ्यात खुद्द स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या अध्यक्षांनीच टोचले. यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक सहसा जाहीरपणे पोटतिडक मांडत नव्हते. पोर्तुगीजांशी शत्रूत्व पत्करणारे स्वातंत्र्यसैनिक विद्यमान सत्ताधाऱ्यांना सुनावताना थोडे मागे राहायचे. मुक्त गोव्यातही आपला किंवा कुटुंबीयांचा छळ व्हायला नको, अशी त्यांची प्रामाणिक भावना असायची. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गुरूदास कुंदे मात्र खरोखर धाडसी, संवेदनशील व प्रामाणिक आहेत. त्यांनी आपले विचार व भावना जाहीरपणे मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या. किल्ले आमच्यासाठी मंदिरे असून, तेथे मद्यविक्रीची सोय करू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. गोवा मुक्त होऊन ६२ वर्षे झाली. जुलमी पोर्तुगीजांना गोव्यातून हद्दपार करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी किती हालअपेष्टा भोगल्या, हे आजच्या भाजप, काँग्रेसवाल्यांना कळणार नाही.
आता ६२ वर्षांनंतर क्रांतिदिन सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या अध्यक्षांना किल्ल्ल्यांवर मद्यविक्री नको, अशी विनंती करावी लागते हे सरकारचे मोठे अपयश आहे. सत्ताधाऱ्यांना याबाबत थोडे तरी वाईट वाटायला हवे. किल्ले हे क्रांती व इतिहासाचे साक्षीदार आहेत. या किल्ल्यांमधील तुरुंगातही अनेक स्वातंत्र्यसैनिक बंदिवान होते. किल्ल्यांवर घाऊक किंवा अन्य कसलेही दारू विक्रीचे दुकान सुरू ठेवण्यात जर सरकारला पुरुषार्थ वाटत असेल तर ते लाजीरवाणे आहे. मग देशभक्तीच्या गोष्टी सांगण्याचा कोणताही नैतिक अधिकार राज्यकर्त्यांना राहात नाही.
आग्वाद किल्ला, रेईशमागूश किंवा तेरेखोल किल्ला हे सगळे सांभाळून ठेवायला हवे. तिथे हॉटेल, मद्यपानाची व्यवस्था ज्या सरकारच्या काळात होत असते, त्या सरकारला शिवशाहीच्या गोष्टी सांगण्याचाही अधिकार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते व त्यांनी गुरूदास कुंदे यांचे भाषण ऐकले असते तर सत्ताधाऱ्यांना शिवरायांनी किती कडक शिक्षा सुनावली असती, याची कल्पना करता येते. औरंगजेबाला शिव्या देताना किंवा औ आणि पौ वरून वाद निर्माण करताना आपण अगोदर शिवरायांचा एक जरी गुण अंगिकारला तर खूप बरे होईल.
पोर्तुगीज काळात मोडलेली मंदिरे नव्याने बांधण्यापूर्वी किल्ल्यांवरील दारू दुकाने बंद केली तर ते पुण्यकर्म ठरेल. निदान शाळेच्या सहलीवेळी निष्पाप विद्यार्थ्यावर किल्ल्यावर दारू दुकान पाहण्याची वेळ येऊ नये, पोर्तुगीज राजवटीतही किल्ल्यांवर दारू दुकाने सुरू झाली नव्हती. एका बाजूने मांडवी नदीत कॅसिनो जुगार आणि नदी किनारी असलेल्या किल्ल्यांवर दारूचे दुकान. तरीही आपण शिवाजी महाराजांचे गुणगान करतो, पोर्तुगीजांच्या सगळ्या खुणा पुसून टाकण्याची भाषा करतो, हे सगळे परस्परविरोधी नाही का?
आग्वाद किल्ल्यावर दारू दुकान सुरू झाले, तेव्हाच स्वातंत्र्यसैनिकांनी आवाज उठवला होता. प्रसारमाध्यमांमधूनही टीका झाली होती. सरकारने तात्पुरते ते दुकान बंद केले, असे वातावरण तयार केले होते. मात्र, नंतर गुपचूप दारू दुकान पुन्हा सुरू झाले असेल तर ते खूप धक्कादायक आहे. जे स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत, त्यांच्या डोळ्यांदेखत किल्ल्यावर असे दुकान सुरू ठेवून स्वातंत्र्यसैनिकांचा सरकार आणखी किती छळ करू पाहते? किल्ल्यावरील दारू दुकान हा आमचा अपमान आहे, असे नमूद करून कुंदे यांनी निषेध केला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला. स्वातंत्र्यसैनिकांच्या अपेक्षांविषयीही बोलले.
सैनिकांच्या मुलांना सरकारने नोकऱ्या दिल्या हेही त्यांनी जाहीर केले. आग्वाद किल्ल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले, पण दारू दुकानाविषयी त्यांनी चकार शब्दही काढला नाही. समजा आज भाजप विरोधी बाकावर असता तर गुरूदास कुंदे यांच्या भाषणानंतर भाजपने त्या किल्ल्यासमोर मोठे आंदोलन केले असते. दारू दुकान बंद करण्याची मागणी करत भारतीय संस्कृतीच्या गोष्टीही सांगितल्या असत्या. मग सत्तेत असताना हे सगळे सद्गुण कुठे बरे जातात?