मी उपोषण अजून सोडलेले नाही - राजन घाटे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:46 AM2018-11-27T11:46:23+5:302018-11-27T11:54:35+5:30
मी उपोषण अजून सोडलेले नाही. चोवीस तासांत किंवा त्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन, असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी मंगळवारी (27 नोव्हेंबर) लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
पणजी - मी उपोषण अजून सोडलेले नाही. चोवीस तासांत किंवा त्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन, असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी मंगळवारी (27 नोव्हेंबर) लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अत्यंत आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाले व त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा ताबा तूर्त एखाद्या नेत्याकडे सोपविला जावा, अशी मागणी घेऊन घाटे पणजीतील आझाद मैदानावर उपोषणास बसले होते. दहा दिवस घाटे यांनी उपोषण केले. राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व विरोधी काँग्रेसने आणि अनेक महिला कार्यकर्त्यांनी घाटे यांना पाठींबा दिला. घाटे यांचे आरोग्य ढासळल्याने सरकारी यंत्रणोने हस्तक्षेप केला व सोमवारी रात्री घाटे यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात (गोमेकॉ) उपचारांसाठी हलविले.
रुग्णालयातून बोलताना घाटे म्हणाले, की माझ्यावर उपचार सुरू झाले आहेत पण मी अजून उपोषण थांबविलेले नाही. मी माझ्या आरोग्याचा विचार करून मी उपोषण थांबवावे अशी विनंती मला सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. मी योग्य तो निर्णय लवकरच घेईन. मी उपोषण मागे घेत नसल्याने रुग्णालयातीतील काही डॉक्टरही माझ्यावर नाराज झालेले आहेत.
घाटे म्हणाले, की मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा म्हणून मी उपोषण केले नाही. मी फक्त मुख्यमंत्रीपदाचा ताबा दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे तुम्ही सोपवावा व प्रशासकीय काम वेगाने मार्गी लावा अशी मागणी घेऊन उपोषणास बसलो. मी कोणत्याच दबावाला बळी पडलो नाही. पंधरा लाख गोमंतकीयांचा प्रतिनिधी या नात्याने मी उपोषण केले अशी माहिती घाटे यांनी दिली.