Goa: गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई, ९९ टक्के काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
By किशोर कुबल | Published: October 11, 2023 01:28 PM2023-10-11T13:28:57+5:302023-10-11T13:29:26+5:30
Goa News: गोव्यात येत्या २६ पासून होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई सुरु आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यानी बुधवारी स्पर्धांचे प्रमुख ठिकाण अससलेल्या ताळगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमची पाहणी केली.
- किशोर कुबल
पणजी - गोव्यात येत्या २६ पासून होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई सुरु आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यानी बुधवारी स्पर्धांचे प्रमुख ठिकाण अससलेल्या ताळगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमची पाहणी केली.
९९ टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले की,‘ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी वापरण्यात येणार असलेली सर्व स्थळे येत्या १५ पूर्वी ॲालिंपिक असोसिएशन ॲाफ इंडियाच्या ताब्यात दिली जातील. बॅडमिंटन स्पर्धा येत्या १९ पासून सुरु होतील.’
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे येत्या २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून ९ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा चालणार आहेत.
‘देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असेल, असे राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले की,‘ या स्पर्धांच्या निमित्ताने गोवेकरांमध्ये खेळांविषयी नवीन आवड निर्माण होईल , अशी आशा आहे. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील १० हजारहून अधिक खेळाडू सहभागी होतील. दक्षिण गोव्यात फातोर्डा येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उद्घाटन होईल. देशी खेळांसह ४३ क्रीडा प्रकार या स्पर्धेत असतील.