गोव्यात पारपंरिक मेळच्यावेळी सरपंचावर प्राणघातक हल्ला, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 08:59 PM2019-03-06T20:59:24+5:302019-03-06T21:00:45+5:30
गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील वेळळी येथे काल मंगळवारी कार्निव्हलच्या पारंपरिक मेळच्या वेळी गावचे सरपंच सावियो डिसिल्वा (43) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली.
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील वेळळी येथे काल मंगळवारी कार्निव्हलच्या पारंपरिक मेळच्या वेळी गावचे सरपंच सावियो डिसिल्वा (43) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली. काल मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली. डेरिक फर्नाडीस व मॉविन फर्नाडीस या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. डेरिक याच्यावरही चाकूने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी कुंकळळी पोलिसांनी शेन फर्नांडीस. रेंडन फर्नाडीस व अॅलरिड फर्नाडीस या तिघा भावांना कुंकळळी पोलिसांनी अटक केल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. भारतीय दंड संहितेच्या 307,325 व 323 कलमाखाली पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत खरात पुढील तपास करीत आहे. मॉविन फर्नाडीस हे तक्रारदार आहेत. मंगळवारी रात्री कार्निव्हलच्या शेवटच्या दिनानिमित्त वेळळी येथे चर्चनजिक पारंपरिक मेळचे आयोजन केले होते. सरपंच सावियो डिसिल्वा व डेरिक फर्नाडीस व मॉविन फर्नाडीस हे तेथे गेले होते. यावेळी तेथे वाहतुकीची कोंडी होती. मूळ बाप्सोरा येथील बुधो केरकर यांनी आई आजारी असल्याने तिला डॉक्टरकडे न्यायचे असल्याने मेळ थोंडा थांबवा व कारला जाण्यासाठी वाट दया असे सांगितले. यावेळी शेन तेथे आला व त्याने केरकर यांच्या कारच्या बोनेटवर प्लास्टिक पाईप हाणला तसेच तक्रारदार तसेच सरपंच डिसिल्वा याच्याकडे हुज्जत घातली.
डिसिल्वा याने त्याची समजूत काढल्यानंतर तो पुन्हा मेळकडे गेला. त्यानंतर केरकर याच्या कारला वाट मोकळी करुन देण्यात आली. त्यानंतर रात्री आठ वाजता एक इसम सरपंच डिसिल्वा याच्याकडे आला व काही लोक मेळच्या ठिकाणी वाद घालत असल्याचे त्यांनी सांगितल्यांतर डिसिल्वा डेरिक व मॉविन याच्यांसह तेथे गेले असता काशेत गावचे लोक मेळाच्या ठिकाणी आपसात वाद घालत असल्याचे दिसून आले, वाद घालू नका शांतता राखा असे आवाहन सरपंच डिसिल्वा केले असता, शेन तेथे आला व त्याने डिसिल्वा यांच्या छातीवर चाकूने हल्ला चढविला, त्यात ते जखमी झाले. शेनने मॉविन यालाही मारहाण केली, त्याच्या रेंडन व अॅलरिड या दोघा भावाने डेरिकरलाही बेदम मारहाण केली. त्याच्यावर चाकूने हल्लाही चढविला अशी माहिती पोलिसांनी दिली.डिसिल्वा याला मागाहून एका खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. नंतर त्याला घरी पाठवून देण्यात आले तर डेरिक याच्यावर गोमेकॉत उपचार चालू असल्याची माहिती कुंकळळी पोलिसांनी दिली.