गोवा सुरक्षा मंचचे दरवाजे शिवसेनेबरोबर युतीसाठी अद्याप खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 08:39 PM2019-03-27T20:39:08+5:302019-03-27T20:39:18+5:30

गोवा सुरक्षा मंच लोकसभेसाठी दोन्ही उमेदवार येत्या रविवारी ३१ रोजी जाहीर करणार आहे.

The Goa Security Forum's doors are open for the coalition with the Shiv Sena | गोवा सुरक्षा मंचचे दरवाजे शिवसेनेबरोबर युतीसाठी अद्याप खुले

गोवा सुरक्षा मंचचे दरवाजे शिवसेनेबरोबर युतीसाठी अद्याप खुले

Next

पणजी : गोवा सुरक्षा मंच लोकसभेसाठी दोन्ही उमेदवार येत्या रविवारी ३१ रोजी जाहीर करणार आहे. लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडे युतीचे दरवाजे या पक्षाने अजून खुले ठेवले आहेत. पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर म्हणाले की, ‘सेनेकडे युतीचा पर्याय खुला असला तरी मांद्रेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

१0 एप्रिलपर्यंत मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होईल. त्यानंतर आठ दिवसात दुसरी फेरी पूर्ण होईल. पणजी मतदारसंघासाठी अजून तारीख जाहीर झाली नसली तरी आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पर्रीकरांच्या तोडीचा उमेदवार आम्ही देणार आहोत. म्हापशात बूथस्तरीय बैठका पूर्ण झालेल्या आहेत. तेथेही १0 एप्रिलपर्यंत प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली जाईल. लोकसभेसाठी उत्तरेत आणि दक्षिणेत प्रत्येकी एकेक नाव निश्चित झालेले आहे आणि ३१ रोजी या नावांची घोषणा केली जाईल.’ 

 ‘मध्यावधी निवडणुका अटळ’

गोव्यात सध्या राजकीय स्तरावर जे काही चालले आहे ते पाहता विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचे भाकित वेलिंगकर यांनी केले. ते म्हणाले की, केवळ ४ विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर कमीत कमी २५ मतदारंसंघांमध्ये उमेदवार देण्याची तयारी गोसुमंने केली आहे. या मतदारसंघांमध्येही पक्षाचे काम जोमाने सुरु आहे.

 अस्थिकलश कार्यक्रम ‘फ्लॉप शो’ - वेलिंगकर यांची टीका 

 भाजपवर आरोप करताना वेलिंगकर म्हणाले की, ‘दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा अस्थिकलश गावोगावी फिरविण्याचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने ‘फ्लॉप शो’ ठरला आहे. पर्रीकरांच्या राजकारणातील प्रतिमेचे भांडवल करण्यासाठी तसेच सहानुभूतीचा फायदा उठविण्यासाठीच अस्थिकलश फिरवण्यात आले. परंतु लोकांनी भाजपला भांडवल करू दिले नाही. लोकहिताच्या अनेक विषयांवर भाजप अपयशी ठरल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला. ते म्हणाले की, ‘ बेरोजगारी, म्हादई, सीआरझेड, प्रादेशिक आराखडा, खाणबंदी या प्रश्नांवर भाजपने लोकांची फसवणूक केली. 

Web Title: The Goa Security Forum's doors are open for the coalition with the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.