गोव्याने पहिली इलेक्ट्रीक बस वापरून परत पाठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:47 AM2018-08-23T11:47:12+5:302018-08-23T11:47:38+5:30
इंजिन नाही, आवाज नाही, पेट्रोल-डिझेल नाही व प्रदूषण नाही अशा प्रकारची पहिली इलेक्ट्रिक बस गोवा सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने तीन महिने गोव्यातील विविध रस्त्यांवर वापरली व परत हैदराबादच्या कंपनीकडे पाठवून दिली आहे.
पणजी : इंजिन नाही, आवाज नाही, पेट्रोल-डिझेल नाही व प्रदूषण नाही अशा प्रकारची पहिली इलेक्ट्रिक बस गोवा सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने तीन महिने गोव्यातील विविध रस्त्यांवर वापरली व परत हैदराबादच्या कंपनीकडे पाठवून दिली आहे. गोव्याला इलेक्ट्रिक बस पसंत पडली. पण गोव्याच्या रस्त्यांवरून खरोखर यापुढे नव्या इलेक्ट्रिक बसगाड्या धावणार की फक्त प्रायोगिक तत्त्वावरच देखाव्यापुरती एक बस आणली गेली होती या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर तूर्त मिळत नाही.
गोव्याची वाहतूक ही पर्यावरणास पूरक असावी व वाहतुकीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचू नये, अशी भूमिका गोवा सरकारने इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करताना घेतली होती. गेल्या 30 जानेवारी रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते गोव्यातील ह्या पहिल्या इलेक्ट्रिक बसचे पणजीत उद्घाटन करण्यात आले होते. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष कालरुस आल्मेदा आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री, वाहतूक मंत्री व इतरांनी मिळून पत्रकारांना सोबत घेऊन या बसगाडीतून पणजी ते बांबोळीपर्यंत फेरफटकाही मारला होता. या बसची बॅटरी चार्ज केल्यानंतर बसगाडी 250 किलोमीटर चालते. मग पुन्हा बॅटरी चार्ज करावी लागते. अशा प्रकारची बसगाडी चालवावी कशी याचे प्रशिक्षण कदंब वाहतूक महामंडळाच्या चालकांना देण्यात आले होते.
गोव्यात एरव्ही बाकीच्या बसगाड्याकडून रोज 535 फे-या मारल्या जातात 18 हजार लिटर इंधन फस्त केले जाते. अशावेळी अधिकाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या गोव्यातील रस्त्यांवरून धावल्या तर इंधनाचीही बचत होईल व प्रदूषणही टळेल, असा विचार सरकारने केला होता. जानेवारीत मोठ्या धूमधडाक्यात सुरू करण्यात आलेली इलेक्ट्रिक बसगाडी डोंगराळ भागातील रस्त्यांवर तसेच उंचसखल जागेवर चालते का याची पाहणी करण्यासाठी रोज ही बसगाडी विविध शहरे व गावांमधील रस्त्यांवर प्रवासी वाहतुकीसाठी कदंबकडून पाठवली जात होती. मोठीशी समस्या आली नाही.
हैदराबादमधील गोल्ड स्टोन इन्फ्राटेक कंपनीने ही 2.45 कोटी रुपये खर्चाची गाडी कदंब वाहतूक महामंळाला प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी दिली होती. ही बस महामंडळाने खरेदी केली नव्हती. पण बस पसंत पडली तर अशा प्रकारच्या 10 बसगाडय़ा गोव्यातील रस्त्यांवरून धावण्यासाठी खरेदी केल्या जातील, असे सरकारने गेल्या जानेवारीत जाहीर केले होते. महामंडळाने बस चालवून ती हैदराबादच्या कंपनीकडे परत पाठवली आहे. ही बस गाडी वापरण्यासाठी किलोमीटरमागे फक्त 55 रुपयांचा देखभालीचा खर्च येतो. गोव्यातील रस्त्यांवर अशा प्रकारच्या अधिकाधिक बसगाड्या याव्यात असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यावेळी म्हणाले होते. मात्र कदंब महामंडळाने पहिली-वहिली इलेक्ट्रिक बसगाडी परत पाठविल्यानंतर आता नव्या अशा प्रकारच्या बसगाड्या गोव्यात कधी धावतील ते स्पष्ट झालेले नाही.