गोव्यात 15 डिसेंबरपासून सेरेंडिपीटी कला महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:00 PM2018-12-06T13:00:57+5:302018-12-06T13:01:49+5:30
भारतातील संगीत, नृत्य आणि थिएटर तसेच पाककला, शिल्पकला, व्हिज्युअल आर्टविषयक वैभवसंपन्न वारशावर प्रकाशझोत टाकण्यासाठी गोव्यात येत्या 15 डिसेंबरपासून सेरेंडिपीटी आर्ट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
पणजी : भारतातील संगीत, नृत्य आणि थिएटर तसेच पाककला, शिल्पकला, व्हिज्युअल आर्टविषयक वैभवसंपन्न वारशावर प्रकाशझोत टाकण्यासाठी गोव्यात येत्या 15 डिसेंबरपासून सेरेंडिपीटी आर्ट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रायबंदर व पणजीसह एकूण दहा ठिकाणी हा महोत्सव पार पडेल. पणजी म्हणजे व्हायब्रंट सांस्कृतिक स्थळ आहे अशी प्रतिमा सेरेंडिपीटी महोत्सव निर्माण करत आहे. अनेक प्रदर्शने, कार्यक्रम व सादरीकरण दहा ठिकाणी केली जातील. रायबंदर येथील जुन्या गोवा मॅनेजमेन्ट संस्थेच्या इमारतीत सेरेंडिपीटी महोत्सवाचे मुख्य ठिकाण असेल. या महोत्सवाची सगळी तयारी या इमारतीत व पणजी शहरात सुरू आहे. यापूर्वी दोनवेळा हा महोत्सव गोव्यात पार पडला.
सेरेंडिपीटी आर्ट्स फाऊंडेशनची स्थापना 2016 साली सुनील कांत मुंजल यांनी केली. यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. महोत्सवाने आतापर्यंत गोव्यात कला निर्माणाच्या वातावरणाला अधिक पुष्टी दिली, असे आयोजकांचे म्हणणे आहे. सांस्कृतिक विकास, दक्षिण आशियातील उदयोन्मूख कलाकारांना पाठींबा देणो हा यंदाच्या सेरेंडिपीटी आर्ट्स महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. देशाच्या विविध भागांतील कलेचे मिश्रण करून निर्माण केलेले प्रकल्प सेरेंडिपीटी महोत्सवस्थळी पहायला मिळतील. मुलांचा थिएटर परफॉर्मन्स, सायंकाळचे संगीत कार्यक्रम, व्हीज्युअल आर्ट व फोटोग्राफीशीनिगडीत मोठी इन्स्टॉलेशन्स ही सेरेंडिपीटी महोत्सवाची वैशिष्ट्यं असतील.
यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सहभाग वाढलेला असेल. भारतीय संस्कृतीशी वैश्विक संवाद त्यामुळे वाढू शकेल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. सेरेंडिपीटी महोत्सव म्हणजे वाव न मिळालेल्या कलाकारांसाठी व्यासपीठ आहे. देशातील विभिन्न कला-संस्कृतीचे चाहते सेरेंडिपीटी महोत्सवानिमित्ताने डिसेंबर महिन्यात गोव्यात भेट देतील. 22 डिसेंबर्पयत हा महोत्सव चालेल.