गोव्यात नाताळात किनारी भागातील वाढती सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन ग्रामीण भागात चालतो सेक्स रॅकेटचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 12:23 PM2017-12-01T12:23:11+5:302017-12-01T15:48:08+5:30
ऑनलाईन पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या या व्यवसायातील दलालांनी व्यवसायचे पाय किनारी तसेच शहरी भागावरुन आता ग्रामीण भागाकडे वळवले आहेत. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ग्रामीण भागातून हा व्यवसाय सुरू करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे
म्हापसा - अमली पदार्थ, सेक्स रॅकेट असे समिकरण झालेल्या गोव्यातील सेक्स रॅकेटचे दलाल पोलिसांना चकवून त्यांचा हा बेकायदेशीर व्यवसाय चालवण्यासाठी विविध युक्त्या अंमलात आणू लागले आहेत. ऑनलाईन पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या या व्यवसायातील दलालांनी व्यवसायचे पाय किनारी तसेच शहरी भागावरुन आता ग्रामीण भागाकडे वळवले आहेत. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ग्रामीण भागातून हा व्यवसाय सुरू करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
राज्यभरात नाताळाचे वेध लागले आहेत. नाताळ संपल्यानंतर लगेचच नवीन वर्षाची धूम गोव्यात सुरू होणार आहे. या काळात देश-विदेशातून पर्यटकांची रिघ गोव्याकडे लागणार आहे. वाढती लोकांची संख्या लक्षात घेऊन राज्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी फिरणेही कठीण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ होणार आहे. नाताळाच्या या काळात किनारी भागात तसेच शहरात वाढणारी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन या भागातून सेक्स रॅकेटचा व्यवसाय सुरू ठेवणे दलालांना कठीण होणार आहे. वाढत्या सुरक्षा व्यवस्थेच्या समस्येमुळे त्यावर तोडगा म्हणून दलालांनी आपल्या व्यवसायाचे स्थलांतरण ग्रामीण भागात केले आहे. नवीन वर्ष साजरे होईपर्यंत राज्यातील ग्रामीण भागात अल्प अशी सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे पोलिसांच्या कचाट्यात सापडण्याची भिती त्यांना कमीच असते.
गोव्यातील ग्रामीण भाग व शहरी तसेच किनारी भागातील अंतरात मोठा फरक नसल्याने तसेच ग्रामीण भागात जाणे या दिवसात बरेच सोयीस्कर ठरत असते. तसेच ज्या सुविधा शहरी भागात तसेच किनारी भागात उपलब्ध आहेत त्यातील बऱ्याच प्रमाणावरील सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामीण भागातून व्यवसाय सुरु करणे किफायतीशीर ठरत असते.
व्यवसायाचे स्थळ बदलले असले तरी त्याची पद्धत मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीनेच तो सुरु ठेवला जातो. दलाल जरी बिगर गोमंतकीय असले तरी काही स्थानिकांना हाताशी धरुन किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करुन हा व्यवसाय चालवला जातो. काहीवेळा व्यवसायासाठी स्थानिकांचे व्यवसाय भाडेपट्टीवर घेऊन त्यातून हा व्यवसाय बेकायदेशीरपणे चालवला जातो.
उत्तर गोव्यातील शिवोली मतदार संघात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाई पाच दलालांना अटक केली होती. तर यात गुंतलेल्या चार युवतींची सुटका सुद्धा केली होती. पकडण्यात आलेले दलाल बिगर गोमंतकीय असले तरी मागील बऱ्याच वर्षापासून ते गोव्यात कार्यरत असल्याने त्यांना गोवा हा बराच परिचयाचा झालेला आहे. त्यामुळे बिनबोभाटपणे ते हा व्यवसाय करु शकतात. इतर राज्यातील दलालां सोबत असलेल्या त्यांच्या संबंधामुळे तेथून युवतींना आणून त्यांचा वापर केल्या नंतर ठरावीक कालखंडानंतर त्यांना पुन्हा माघारी पाठवून देत असतात.
गेल्या वर्षी उत्तर गोव्यातील साळगाव, पर्रा तसेच इतर किनारी व शहराजवळ असलेल्या ग्रामीण भागातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करुन बऱ्याच दलालांना पकडलं होतं. केलेल्या कारवाईचा कालखंड डिसेंबर हाच महिना होता. त्यामुळे सेक्स रॅकेटातील दलाल या महिन्यात ग्रामीण भागाकडे वळतात हे दिसून येत आहे.