ऐतिहासिक! गोव्यात दहावीचा निकाल ९२.४७ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 01:15 PM2019-05-21T13:15:55+5:302019-05-21T13:23:57+5:30
गोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला.
पणजी - गोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला. ९८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात ६७ अनुदानित तर ३१ सरकारी माध्यमिक विद्यालये आहेत.
गोवा शालांत मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी सकाळी ११.३0 वाजता पर्वरी येथे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी बोर्डाचे सचिव भगिरथ शेट्ये, परीक्षा विभागप्रमुख ज्योत्ना सरीन उपस्थित होत्या. गेल्या सलग तीन ते चार वर्षात निकालाची टक्केवारी वाढण्याचे कारण विचारले असता सामंत म्हणाले की, ‘विद्यार्थी तसेच शिक्षकही जादा परिश्रम घेत असावेत. नववीमध्ये विद्यार्थी गळण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा हुशार विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाने संकेतस्थळावर उपलब्ध केल्या होत्या त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला.’ पेपर तपासणीबाबत सौम्य धोरण अवलंबिल्याचा सामंत यांनी इन्कार केला.
१८,६८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील १७,२७८ उत्तीर्ण झाले. एकूण २७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. ९२१५ मुलांनी परीक्षा दिली त्यातील ८५0६ उत्तीर्ण झाले. मुलं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.३१ टक्के आहे. तर ९४६९ मुलींनी परीक्षा दिली. त्यातील ८७७२ उत्तीर्ण झाल्या. मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के आहे.
क्रीडा गुणांचा उत्तीर्ण होण्यासाठी २७९ जणांना लाभ
एकूण ७१२२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात २७९ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी १.६१ टक्के इतकी आहे.
३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १४ जूनपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी २५ मे ते १ जून या कालावधीत केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. २ जूननंतर प्रत्यक्ष अर्जही स्वीकारले जाणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुणांमध्ये सुधारणा हवी असेल तर त्यांनीही ही परीक्षा देता येईल.
गोव्यातील गेल्या पाच वर्षातील शालांत निकाल
२0१४ - ८३.५१ टक्के
२0१५ - ८५.१५ टक्के
२0१६ - ९0.९३ टक्के
२0१७ - ९१.५७ टक्के
२0१८ - ९१.२७ टक्के