दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल ९२.३८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 11:40 AM2024-05-16T11:40:28+5:302024-05-16T11:41:25+5:30
गतवर्षीच्या तुलनेत ४.२६ टक्क्यांनी कमी; दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८७.२४ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा शालान्त मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२.३८ टक्के लागला असून, या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण १८,९१४ जणांनी परीक्षा दिली. पैकी १७,४७३ उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४.२६ टक्क्यांनी निकाल कमी लागला.
गोवा बोर्डाचे चेअरमन भगीरथ शेट्ये यांनी काल, बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी बोर्डाचे सचिव विद्यादत्त नाईक तसेच उपसचिव (आयटी विभाग) भरत चोपडे हे उपस्थित होते.
९३१८ मुले परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८५५६ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९१.८२ टक्के आहे. तर ९५९६ मूली परीक्षेला बसल्या होत्या, त्यापैकी ८९१८ उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ९२.९३ टक्के आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची कामगिरीही उत्कृष्ट ठरली. ४६४ दिव्यांगांनी परीक्षा दिली. पैकी ४०७. जण उत्तीर्ण झाले. हा निकाल ८७.२४ टक्के आहे. गेल्या वर्षी सेमिस्टर पद्धत होती. त्यामुळे परीक्षेला निम्माच अभ्यासक्रम होता व निकाल २६.६४ टक्के लागला होता, या वर्षी संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम परीक्षेला होता.
दरम्यान, उत्तरपत्रिकांची फेरतपासणी, फेरमूल्यांकन किंवा विद्यार्थ्यांच्या अन्य काही तक्रारी असल्यास त्या हाताळण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश विद्यालयांना बोर्डाने दिलेले आहेत. या समितीवर समुपदेशकही नेमता येईल, असे शेट्ये यांनी सांगितले. पुढील वर्षी दहावीची परीक्षा एप्रिलऐवजी एक महिना आधी म्हणजेच मार्चमध्ये घेतली जाईल. जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीलाच परीक्षा सुरू होतील. वर्षभराचा अभ्यासक्रम परीक्षेला असेल. अभ्यासक्रमात कोणताही बदल झालेला नाही, असे शेट्ये यांनी सांगितले.
२६३ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ
७,१२२ विद्यार्थ्यांना कौडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात २६३ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी १.५१ इतकी आहे. दरम्यान, सांस्कृतिक गुणांबाबत अजून काहीच निर्णय झालेला नाही, असे एका प्रश्नावर शेट्ये यांनी सांगितले.
८६९ एटीकेटी
एक किंवा दोन विषयांमध्ये सुधारणा आवश्यक असा शेरा पडलेल्या ८६९ जणांना एटीकेटी देण्यात आली आहे. या सर्वांना अकरावीत प्रवेश मिळेल; परंतु त्यांनी दहावीचे राहिलेले विषय नंतर सोडवावे लागतील. एटीकेटी मिळालेल्यांमध्ये ६८७ सर्वसाधारण वर्गवारीतील, २०१ ओबीसी, २१ एससी व ६० एसटी समाजाचे आहेत.
१० जूनला पुरवणी परीक्षा
३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि सुधारणा हवी असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी साधारणपणे १० जूनला पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. दोनपेक्षा अधिक विषयांमध्ये नापास झालेल्या व सुधारणा आवश्यक असा शेरा दिलेले विद्यार्थी या परीक्षेस बसू शकतात.
दुर्गम केंद्राची उत्कृष्ट कामगिरी
केंद्रनिहाय ज्या ३१ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या, त्यातील नेत्रावळी हे अतिशय दुर्गम केंद्र, परंतु येथे विद्याथ्यांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली. या केंद्राचा निकाल ९७.१६ टक्के एवढा लागला. १४१ पैकी १३७ जण उत्तीर्ण झाले. मंगेशीसारख्या ग्रामीण केंद्रावर २९४ जणांनी परीक्षा दिली. त्यातील २८८ उत्तीर्ण झाले. हा निकाल ९७.९६ टक्के आहे.
काणकोणचा सर्वाधिक ९५.०२ टक्के
विद्याथ्यांच्या परीक्षेतील कामगिरीचा तालुकानिहाय आढावा घेतला असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येच चमक दिसून आली. काणकोण तालुक्यातून ६६३ जण परीक्षेस बसले. पैकी ६३० उत्तीर्ण झाले. हा निकाल ९५.०२ टक्के आहे. धारबांदोडा : ३२४ जणांनी परीक्षा दिली, पैकी २८३ उत्तीर्ण, ८७.३५ टक्के, केपे : २०१९ जणांपैकी २१८ उत्तीर्ण, हा निकाल ९०.०९ टक्के, पेडणे : ९२२ जणांपैकी ८६९ उत्तीर्ण, हा निकाल १४.२५ टक्के, सांगे: ४०४ जणांपैकी ३६२ जण उत्तीर्ण, हा निकाल ८९.६० टक्के, तर सत्तरी ७१८ जणांपैकी ६५४ उत्तीर्ण असून, हा निकाल ९१.०९ टक्के आहे.
दोन विद्यालयांना कारणे दाखवा; ९७ जणांचा निकाल राखून ठेवला
विद्यालयांमध्ये घेतलेल्या परीक्षेतील अंतर्गत गुण अपलोड न केल्याने दोन शैक्षणिक संस्थांवर कारवाई केली जाणार आहे. या विद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. तसेच १७ जणांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. एक तर या विद्याथ्यांचे प्रक्टिकलचे किया अंतर्गत गुण विद्यालयांनी पाठवले नसतील किंवा विषय बटलेला असेल, ही यासाठी कारणे आहेत, अशी माहिती शेट्ये यांनी दिली. २० गुणांची अंतर्गत परीक्षा विद्यालयांमध्ये घेतली जाते. हे गुण पोर्टलवर अपलोड करायचे असतात, परंतु, या विद्यालयांनी ते केले नाहीत. त्यामुळे निकाल राखून ठेवावा लागला, शेट्ये म्हणाले की, अनेकवेळा या हायस्कूलना फोन करून गुण अपलोड करण्यास सांगितले, परंतु, ते केले नाहीत. काही तांत्रिक अडचणी असत्या तर त्यांनी आम्हाला येऊन भेटायला हवे होते. हा निव्वळ निष्काळजीपणा असल्याचे शेट्ये यांनी म्हटले आहे.