गोव्यात उद्धव ठाकरे-वेलिंगकर युतीवर मोहर
By Admin | Published: October 22, 2016 05:47 PM2016-10-22T17:47:51+5:302016-10-22T18:06:00+5:30
गोवा विधानसभा निवडणूकीत गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेतील युतीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केले.
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २२ - गोवा विधानसभा निवडणूक येत्या जानेवारी- फेब्रुवारीमध्ये होणार असून त्यावेळी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेने युती करावी यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिक्कामोर्तब झाले आहे. मातृभाषा रक्षणाचा मुद्दा हाती घेऊन गोवा सुरक्षा मंच हा पक्ष स्थापन केलेल्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याशी हातमिळवणी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केली.
गोव्यातील इंग्रजी शाळांचे अनुदान बंद व्हायला हवे व मराठी-कोंकणी माध्यमातील प्राथमिक शाळांनाच सरकारी अनुदान मिळायला हवे ही मागणी घेऊन भारतीय भाषा सुरक्षा मंचने राज्यात आंदोलन उभे केले आहे. मातृभाषा रक्षक नोंदणीची मोहीम राज्यभर सुरू आहे. उद्धव ठाकरे हे शनिवारी गोवा भेटीवर दाखल झाले. त्यांनी पर्वरी येथे शिवसैनिकांचा मेळावाही घेतला व गोव्यात सत्ताबदल घडविण्यासाठी आम्ही वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचशी युती करू, असे जाहीर केले. आम्ही गोव्यात केवळ कुणाला तरी हरवावे असा हेतू घेऊन नव्हे तर गोव्यात जिंकण्यासाठी आलेलो आहोत, शिवसेना गोव्यात जिंकणारच असे ठाकरे पर्वरी येथील मेळाव्यावेळी म्हणाले. गोव्यात शिवसेनेच्या गावागावांत शाखा सुरू करा, असे आवाहन ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
सायंकाळी प्रा. वेलिंगकर, गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर, सुभाष देसाई, खजिनदार महेश म्हांब्रे यांनी संयुक्तपणो उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. ठाकरे व वेलिंगकर यांच्यात सविस्तर चर्चा झाली. गोवा सुरक्षा मंचचे भाषाविषयक धोरण ठाकरे यांनी मान्य केले. येत्या निवडणुकीवेळी सत्ताधारी भाजपविरुद्ध तसेच विरोधी काँग्रेसविरुद्धही शिवसेना व गोवा सुरक्षा मंचने एकत्रपणो लढावे असे या बैठकीत ठरले.
आमची उद्धव ठाकरे यांच्यासोबत पहिली बैठक यशस्वी झाली. आम्ही एकत्रपणो निवडणुका लढवाव्या असे या बैठकीवेळी तत्त्वत: ठरले. जागा वाटप व युतीबाबतचा पुढील तपशील हा येत्या काही दिवसांत ठरेल. दिवाळीपूर्वीच त्याबाबतचे काम सुरू होईल.
- प्रा. सुभाष वेलिंगकर, समन्वयक