मेट्रो, रेल्वे मार्गांसाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 01:41 PM2024-06-25T13:41:39+5:302024-06-25T13:42:34+5:30

पणजी-मडगाव मेट्रो तसेच मोपा विमानतळ ते पेडणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमार्ग घालण्याचा प्रस्ताव आहे.

goa state proposal to center for metro and rail lines | मेट्रो, रेल्वे मार्गांसाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव

मेट्रो, रेल्वे मार्गांसाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: गोव्यातील शहरे मेट्रो तसेच रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारकडे ठेवला आहे. पणजी-मडगाव मेट्रो तसेच मोपा विमानतळ ते पेडणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमार्ग घालण्याचा प्रस्ताव आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली भेटीत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा प्रस्ताव ठेवला, केंद्र सरकारने यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने रोज हजारो वाहने राज्यात प्रवेश करतात, त्यामुळे रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो आवश्यक बनली आहे. त्यामुळे फोंडा, वास्को व म्हापसा ही प्रमुख शहरेही मेट्रोने जोडण्याची योजना आहे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळही आता प्रवाशांनी गजबजू लागला आहे. रोज हजारो पर्यटक मोपा विमानतळावर उतरतात. त्यामुळे मोपा ते पेडणे किंवा अन्य शहरांना जोडणारी मेट्रो किंवा रेल्वे आवश्यक बनली आहे. दरम्यान, आश्विनी वैष्णव यांच्याकडे माहिती व प्रसारण खातेही असल्याने गोव्यात येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या ५५ व्या इफ्फच्या अनुषंगानेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा विनिमय केला.

२००४ साली मडगाव येथे केला होता प्रयोग

२००४ साली कोकण रेल्वेने मडगाव येथे १.६ कि.मी. मेट्रो मार्ग तयार करून प्रयोग केला होता. परंतु, तो यशस्वी होऊ शकला नाही. मेट्रोची ट्रायल घेण्याच्या नादात अपघात होऊन एक कर्मचारी ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर हा प्रकल्पच थंडावला. प्रत्यक्षात मडगावमध्ये या मेट्रो मार्गाचा १०.५ कि.मी. पर्यंत विस्तार करण्यात येणार होता. परंतु, अपघातानंतर काम बंदच राहिले व २०१३ साली कोकण रेल्वेने हा प्रकल्पच गुंडाळला.

 

Web Title: goa state proposal to center for metro and rail lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.