राज्याला पावसाने झोडपले! आतापर्यंत २५ इंचांची नोंद, अनेक ठिकाणी पडझड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 10:01 AM2023-07-01T10:01:34+5:302023-07-01T10:01:51+5:30
'येलो अलर्ट' जारी
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्याला काल पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दुपारी थोडासा विसावा घेतला. परंतु, पुन्हा दमदार हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. गेला आठवडाभर राज्यात पावसाचा जोर सुरूच असून, सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात १ जूनपासून आतापर्यंत २५.७ इंच पाऊस झाला आहे.
गेल्या २४ तासांत आतापर्यंत मडगाव केंद्रात सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झाली आहे. मडगाव केंद्रात आतापर्यंत ३१ इंच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत म्हापसा केंद्रात सर्वाधिक जास्त ६ इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसात आतापर्यंत एकूण ३० इंच पावसाची नोंद झाली आहे.
२८ तारखेपर्यंत वाळपई केंद्रात फक्त १७.८ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्याच्या खालोखाल साखळी केंद्रात २३.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राजधानी पणजीत गेल्या २४ तासांत ४.६ इंच पाऊस झाला आहे.
पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने पुढील चार दिवस जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. येलो अलर्ट जारी केल्याने मच्छीमारांना खोल आता समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
रस्ते दिसेनासे झाले
राज्यात अनेक भागांत संततधार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. स्मार्ट सिटीतील अनेक रस्ते तर सध्या पाण्यामुळे दिसेनासे झाले आहेत. काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
मडकईत झाड पडून घर जमीनदोस्त
दुतळे - मडकई येथे सखाराम नाईक यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून ४ लाखांचे नुकसान झाले.. यात सखाराम नाईक हे पत्नी उत्तरासह जखमी झाले आहेत.