गोव्यातील सासष्टी तालुक्यात अजूनही 3371 घरे शौचालयाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:03 PM2018-12-05T17:03:33+5:302018-12-05T17:03:43+5:30
गोवा राज्य उघड्यावरील शौच्याच्या समस्येपासून मुक्त व्हावे यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणोकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. शौचालये नसलेल्या भागात या तालुक्यातील किनारपट्टीतील गावाचा प्रामुख्याने समावेश आहे.
मडगाव: सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या गोव्यातील सासष्टी तालुक्यात अजूनही 3371 घरांना शौचालयाची सोय नसून या भागात उघड्यावर शौच केले जाते, असे ग्रामीण विकास यंत्रणेकडून केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे सर्वेक्षण झाल्याच्या माहितीपासून स्थानिक पंचायती मात्र अनभिज्ञ आहेत.
गोवा राज्य उघड्यावरील शौच्याच्या समस्येपासून मुक्त व्हावे यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणोकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. शौचालये नसलेल्या भागात या तालुक्यातील किनारपट्टीतील गावाचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र या गावात ही परिस्थिती असताना पंचायतींनी ही समस्या सोडविण्यासाठी काय करावे याची कल्पना एकाही पंचायतीला नसल्याचे दिसून आले आहे.
ग्रामीण स्वच्छ भारत योजनेखाली केलेल्या सर्वेक्षणात सासष्टीत एकूण 3371 घरे शौचालयाविना असल्याचे दिसून आले असून त्यात किनारपट्टी भागातील घरांची संख्या 758 आहे. यात बाणावलीत 258, वाक्र्यात 125, बेताळभाटी येथे 127, कोलवा येथे 96 तर केळशी या भागात 75 घरांचा समावेश आहे.
या पंचायतीसमोर ही आंकडेवारी आली असली तरी पुढची उपायायोजना काय याबद्दल अजुनही कुठल्याही सुचना आल्या नसल्याची माहिती बाणावलीच्या सरपंच डियेला फर्नाडिस यांनी दिली. तर केळशीचे सरपंच दियोनिजो डायस यांनी ग्रामीण विकास यंत्रणोकडे शौचालय बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवूनही अद्याप त्यावर निर्णय न झाल्याचे सांगितले. सदर सव्र्हेक्षण ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले होते. मात्र अजुनही त्याबद्दल कोणती उपाययोजना घ्यावी याची माहिती पंचायतीने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. कोलवाचे सरपंच अँथनी फर्नाडिस यांनी गोवा सरकारकडून याबाबतीत लवकरच सकारात्मक उपाययोजना घेतल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली.
वास्तविक 2018 च्या 2 ऑक्टोबरपर्यंत गोवा शंभर टक्के उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. त्यासाठी प्रत्येक गावात बायो-टॉयलेटची सोय करण्याचे ठरले होते. मात्र ही तारीख कधीचीच उलटून आता 19 डिसेंबर ही गोवा मुक्तीदिनाची तारीख त्यासाठी ठरविण्यात आली आहे. पण पंचायत खात्याचा कुर्मगती कारभार पहाता या तारखेलाही हे उद्दिष्ट गाठणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.