गोवा अजून सुरक्षित, कोरोनाचा फैलाव नाही : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 07:41 PM2020-03-30T19:41:27+5:302020-03-30T19:41:36+5:30
गोव्यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती सुधारत आहे.
पणजी : राज्याच्या सीमा सील केल्यामुळे गोव्यात कोरोनाचा फैलाव झालेला नाही. गोवा अजून सुरक्षित आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती सुधारत आहे. त्यांच्या संपर्कातील अनेकांना निगराणीखाली ठेवले आहे. गोव्यात आता मोठ्या प्रमाणात कसलाच तुटवडा नाही. फक्त औषधांचा तुटवडा आहे. त्यावरही उपाय काढला जाईल. अन्न धान्याचा पुरवठा सुरु झाला आहे. आमदारांना मतदारसंघात लोकांना धान्य वाटणे सुरक्षित व्हावे म्हणून चाळीसही आमदारांच्या प्रत्येकी दोनशे कार्यकर्त्यांना आम्ही पास दिले. त्यामागे काही राजकारण नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात 268 टन भाजी फलोत्पादन विकास महामंडळाने उपलब्ध केली आहे. महामंडळाच्या 1200 दालनांमधून विक्री सुरू झाली आहे. मजुरांचीही काळजी आम्ही घेत आहोत. मी स्वतः पेडे येथे मजुरांच्या कॅम्पला भेट दिली व समस्या जाणून घेतल्या. काहीजणांना त्यांच्या गोव्यातीलच खोलीवर जाऊन रहायचे आहे त्याना जाऊ दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
जिल्हा मिनरल निधीतून 52 कोटी रुपये खर्च करू
कोरोनाविरोधी उपाययोजनांसाठी सरकार जिल्हा मिनरल निधीतून 52 कोटी रुपये खर्च करील. केंद्रीय खाण मंत्रालयाने सर्व राज्यांना तशी सूचना केली आहे. त्यापैकीच सोळा कोटी रुपये खर्चून 200 वेन्टीलेटर्स खरेदी केले जातील. आमच्याकडे 40 वेन्टीलेटर्स आहेत असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
देऊळांनी मदत करावी
राज्यातील देऊळांकडे प्रचंड पैसा आहे. मंदिरांनी आता कोरोनाविरोधी लढ्यात मोठे योगदान द्यावे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी कोविद फंडात जमा करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
गिरण्या सुरु करा
राज्यातील पिठाच्या गिरण्या बंद आहेत. त्यांनी त्या सुरू कराव्यात असेही आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.