गोव्यातील विद्यार्थी ड्रग्जच्या विळख्यात, विधानसभेत चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 06:34 PM2017-12-18T18:34:09+5:302017-12-18T18:34:32+5:30
गोव्यातील विद्यार्थी ड्रग्जच्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेले असून महाविद्यालयांपासून हायस्कूलपर्यंत अंमली पदार्थाचा शिरकाव झाला आहे, अशा शब्दांत गोवा विधानसभेत सोमवारी चिंता व्यक्त करण्यात आली.
पणजी : गोव्यातील विद्यार्थी ड्रग्जच्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेले असून महाविद्यालयांपासून हायस्कूलपर्यंत अंमली पदार्थाचा शिरकाव झाला आहे, अशा शब्दांत गोवा विधानसभेत सोमवारी चिंता व्यक्त करण्यात आली. पोलीस यंत्रणा याविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत अपयशी ठरत आहे, अशी टीका विरोधी काँग्रेसच्या आमदारांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मात्र अंमली पदार्थ व्यापाराचे गोव्यातून समूळ उच्चटन केले जाईल, असे जाहीर केले.
काँग्रेसचे आमदार प्रतापसिंग राणो यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडली होती. ड्रग्ज व्यवसायात गुंतलेल्या विदेशी व्यक्तींची त्यांच्या मायदेशात परत पाठवणी केली जावी, अशी मागणी राणे यांनी केली होती. भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले, की केवळ किरकोळ स्वरुपात जे ड्रग्जची विक्री करतात, त्यांनाच पोलीस अटक करतात. जे मोठ्या प्रमाणात गोव्यात ड्रग्जचा साठा करून ठेवतात आणि ड्रग्जचा पुरवठा करतात, त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही. विदेशातूनही मोठ्या संख्येने व्यक्ती केवळ खोट्या विद्यार्थी व्हिसावर गोव्यात फक्त ड्रग्जचा धंदा करण्यासाठी येतात. अशा कथित विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून कारवाई केली जावी.
काँग्रेसचे आमदार लुईडीन फालेरो म्हणाले, की नावेली मतदार संघासह राज्यातील काही पुलांवर रात्रीच्यावेळी तरुणांचे घोळके जमतात. तिथे मुलींनाच घेऊन ते येतात आणि ड्रग्जचा वापर तिथे केला जातो. पुलावर वीज दिव्यांचीही सोय नसते. आपण काही हायस्कुलांचे प्रिन्सीपल तसेच काही शैक्षणिक संस्थांशीनिगडीत ख्रिस्ती धर्मगुरुंची भेट घेतली व विद्यार्थी ड्रग्जच्या आहारी कसे काय जातात याविषीयची माहिती गोळा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनीही फालोरो यांच्या मताशी सहमती व्यक्त केली. निदान मुले तरी, ड्रग्जच्या विळख्यात सापडू नयेत म्हणून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आलेमाव यांनी केली.
कर्णकर्कश संगीत रात्रभर आणि दिवसाही सकाळी सात वाजेपर्यंत वाजवत पार्ट्या आयोजित केल्या जातात. याचा त्रास विद्यार्थ्यांना आणि कुटुंबांमधील आजारी व्यक्तींना होत असतो. अशा प्रकारच्या अनेक पार्ट्यामध्ये ड्रग्जचा वापर चालतो. कारवाई व्हावी म्हणून आम्ही पोलिस अधिका-यांना फोन केले तरी देखील प्रतिसाद दिला जात नाही, असे आमदार दयानंद सोपटे म्हणाले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी अशा अधिका-यांविरुद्ध कारवाई केली जावी, अशी मागणी केली.
2018 साल ड्रग्जविरोधी वर्ष
- 2018 साल हे ड्रग्जविरोधी आणि अपघातविरोधी वर्ष म्हणून पाळले जाईल, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जाहीर केले. आपण किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही पद्धतीच्या ड्रग्ज विक्रीविरोधात व्यापक स्वरुपात कारवाई करीन. त्यासाठी अंमली पदार्थविरोधी विभाग बळकट केला जाईल. अधिक मनुष्यबळ दिले जाईल. महाविद्यालयांमध्ये ठराविक कालावधीत साध्या वेशातील पोलिसांना पाठविले जाईल. राज्यातील 70 हॉटेल्स आणि जागा अशा आहेत, जिथे अंमली पदार्थ मिळतात असे आढळून आले आहे. अशा हॉटेलांना आम्ही रात्रीच्यावेळी उशिरा पार्ट्याचे आयोजन करू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.