कृषी अभ्यासक्रमासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांची ‘दापोली’लाच पसंती, गोव्याचे 17 विद्यार्थी घेताहेत कृषी शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 12:50 PM2017-10-03T12:50:50+5:302017-10-03T12:51:51+5:30
कृषी अभ्यासक्रमासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांची दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठालाच जास्त पसंती आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्राकडे पाठपुरावा करुन गोवा सरकारने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात यंदा गोमंतकीयांसाठी नऊ जागा वाढवून घेतल्या आहेत.
पणजी : कृषी अभ्यासक्रमासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांची दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठालाच जास्त पसंती आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्राकडे पाठपुरावा करुन गोवा सरकारने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात यंदा गोमंतकीयांसाठी नऊ जागा वाढवून घेतल्या आहेत.
राज्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोकणातील हवामान, तेथील माती गोव्याशी मिळतीजुळती आहे. कोणी विदेशात जाऊन कृषी शिक्षण घेतले तर त्याचा कोणताही फायदा राज्याला होणार नाही याचे कारण तेथील हवामान, जमीन वेगळ्या पध्दतीची असते. कोकण कृषी विद्यापीठाचा ‘वेंगुर्ला-४’ काजू, ‘रत्ना’ हा आंबा गोव्याच्या हवामानाला मानवला आहे. गोव्यात या कलमांची मोठ्या प्रमाणात लागवड करुन पीकही घेतले जात आहे.’
आजवर गोव्याच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ ८ जागा दापोलीच्या या विद्यापीठात राखीव होत्या. सरदेसाई यांनी कृषी खात्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि आणखी ९ जागा वाढवून घेतल्या. या नऊ विद्यार्थ्यांची तुकडी नुकतीच दापोलीला रवाना झाली. महाविद्यालय आधीच सुरु झाले असले तरी महिनाभराचा चुकलेला अभ्यासक्रम भरुन काढण्याची तयारी या विद्यार्र्थ्यांनी ठेवलेली आहे.
कृषी पर्यटनाला गोव्यात बराच वाव आहे. गोमंतकीय विद्यार्थ्यांना बाहेरगांवी कृषी प्रशिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत सरकार करील, अशी ग्वाही सरदेसाई यांनी दिली आहे. म्हणाले की, दापोलीत शिक्षणासाठी जाणाºया गोव्याच्या विद्यार्थ्यांना पूर्वी केवळ राज्य सरकारकडून महिना केवळ ३00 रुपये स्टायपेंड मिळत होती आज ती ३ हजार रुपये करण्यात आली आहे. राज्यात कृषी क्षेत्रात अधिकाधिक आधुनिकता यायला हवी. सध्या काजू, आंबा आदी फळांबाबत चांगल्या कलमांसाठी परराज्यावर अवलंबून रहावे लागते. वेंगुर्ला-४ या जातीच्या कलमामुळे काजू उत्पन्न सात ते आठ पटींनी वाढले आहे. अशा पध्दतीचे संशोधन व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.