मागण्यांवर तोडगा नाही, गोव्यात उद्याही टुरिस्ट टॅक्सी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 08:00 PM2018-01-19T20:00:27+5:302018-01-19T20:02:48+5:30
राज्यात टुरिस्ट टॅक्सीमालकांच्या मागण्यांवर तोडगा येऊ न शकल्याने उद्या शनिवारीही टॅक्सी बंद ठेवल्या जातील. संपामुळे पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. सुमारे २0 हजार टुरिस्ट टॅक्सी बंद आहेत.
पणजी : राज्यात टुरिस्ट टॅक्सीमालकांच्या मागण्यांवर तोडगा येऊ न शकल्याने उद्या शनिवारीही टॅक्सी बंद ठेवल्या जातील. संपामुळे पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. सुमारे २0 हजार टुरिस्ट टॅक्सी बंद आहेत.
स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मिटरला विरोध करीत राज्यातील टॅक्सीमालकांनी बंद पुकारला आहे. सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर चालणा-या अवघ्या काही निवडक वगळता सुमारे ९५ टक्के टॅक्सी आज बंद राहिल्या. सर्व प्रमुख हॉटेलांच्या आवारात तसेच रेल्वे स्थानके , दाबोळी विमानतळ तसेच बसस्थानकांच्या आवारात असलेल्या टुरिस्ट टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या. काळ्या-पिवळ्या टॅक्सींनी या संपात सहभाग न घेतल्याने त्या मात्र चालू होत्या.
सुमारे २ हजार टॅक्सीमालकांनी येथील आझाद मैदानात जमा होऊन आंदोलन केले परंतु दिवसभरात कोणताही तोडगा निघाला नाही.
पाच आमदार, तीन मंत्र्यांनी घेतली भेट -
काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाबू कवळेकर, आमदार रेजिनाल्द लॉरेन्स, आमदार रवी नाईक यांनी आझाद मैदानावर आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिला. तत्पूर्वी सकाळी काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडीप्रमुख प्रतिमा कुतिन्हो तसेच राजन घाटे यांनी भेट देऊन समर्थन दिले. राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनीही आंदोलकांची भेट घेऊन आपण सदैव टॅक्सीवाल्यांबरोबर असल्याचे स्पष्ट केले.
‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’बद्दल बोलणाºयांनी या आंदोलनाबाबत आपली भूमिका सायंकाळपर्यंत स्पष्ट करावी, असे आवाहन टॅक्सीवाल्यांनी केले होते. सायंकाळी नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर व जलस्रोतमंत्री विनोद पालयेंकर या गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेतली.
सरदेसाई यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘काही गोष्टी सरकारच्या आवाक्याबाहेर असतात. वैयक्तिकदृष्ट्या मी ‘ओला’ किंवा ‘उबेर’ गोव्यात आणण्याच्या विरोधात आहे. त्याऐवजी गोमंतकीय टॅक्सीवाल्यांसाठी वॉटसअपधारित अॅप तयार करुन त्यांना व्यवसाय मिळेल हे पहावे. याठिकाणी गोमंतकीय टॅक्सीमालकांप्रती सहानुभूती दाखवण्यासाठीच आलो आहे’.
मायकल लोबोंचा मध्यस्थीचा प्रयत्न -
सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनीही आंदोलकांची भेट घेतली. पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू, असा प्रस्ताव त्यांनी दिला परंतु टॅक्सीवाल्यांनी तो धुडकावून लावला. टुरिस्ट टॅक्सींचा संप चिरडण्यासाठी सरकार जर ‘ओला’ किंवा ‘उबेर’ची सेवा गोव्यात सुरु करण्याचा विचार करीत असेल तर आम्ही चाळीसही आमदारांविरुध्द काम करु आणि त्यांच्याविरुध्द आघाडी उघडू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावरुन आंदोलक पांगले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना मागण्या मान्य न झाल्याने उद्या शनिवारीही टॅक्सी बंद ठेवल्या जातील, असे जाहीर करण्यात आले आहे. उत्तर गोवा टॅक्सीमालक संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. शुक्रवारचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांनी उत्तर गोव्यात जमावबंदीची मुदत आज शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाढविली आहे.