Goa: जुने गोवेंचे प्रसिध्द फेस्त उद्या, कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज भागातून पायी चालत येतात भाविक
By किशोर कुबल | Published: December 3, 2023 01:16 PM2023-12-03T13:16:35+5:302023-12-03T13:17:48+5:30
Goa News: जुने गोवें येथील जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उद्या सोमवारी ४ रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे केले जाईल. त्यासाठी देशभरातून भाविकांची जुने गोवेंकडे रीघ लागली आहे.
- किशोर कुबल
पणजी - जुने गोवें येथील जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उद्या सोमवारी ४ रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे केले जाईल. त्यासाठी देशभरातून भाविकांची जुने गोवेंकडे रीघ लागली आहे.
उद्या सोमवारी सकाळी १0.३0 वाजता मुख्य प्रार्थनेच्यावेळी प्रमुख उत्सवमूर्ती म्हणून बडोद्याचे बिशप फादर सेबेस्त्यॅांव माश्कारेन्हस संबोधतील व भाविकांना शांती, सलोख्याचा संदेश देतील. गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्रांव हेही उपस्थित राहतील.
पहाटे ४ वाजल्यापासून प्रार्थना सुरु होतील. सकाळी ९ वाजेपर्यंत तासातासाने प्रार्थना होतील. सकाळी १0.३0 मुख्य प्रार्थनेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, आमदार व इतर महनीय उपस्थित राहणार आहेत. या फेस्तानिमित्त गेल्या २५ नोव्हेंबरपासून ‘नोव्हेना’ (प्रार्थना) सुरु झालेल्या आहेत. ‘नोव्हेना’ नऊ दिवस चालतात. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशातील इतर भागातून लाखो भाविकांची उपस्थिती या एकूण काळात असते. विदेशातूनही भाविक या फेस्तासाठी येतात.
शेजारी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक या फेस्ताला येतात. कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, नेसर्गी, मधवाल, देसनूर भागातून चालत यात्रेकरु ख्रिस्ती भाविक गोव्यात येतात. त्यांच्यासाठी मराठी, कन्नड तसेच विदेशी भाविकांसाठी स्पॅनिश व फ्रेंच भाषेतूनही प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ नंतरही सायंकाळपर्यंत तासातासाने प्रार्थनांचे आयोजन आहे. चर्चच्या आवारात भव्य व्यासपीठे तयार केली आहेत. एलईडी आणि भव्य स्क्रीन्सची व्यवस्था आहे. टीव्ही चॅनल्स, यु ट्युबवर मुख्य प्रार्थनेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
फेस्तानिमित्त जुने गोवे भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फेस्तानिमित्त भरणाय्रा फेरीसाठी जुने गोवेंत मेणबत्त्या तसेच मेणाचे अवयव विकणारे व्यावसायिक, चणें विक्रेते, खाजें विक्रेते, पारंपरिक मिठाई तसेच फर्निचर, तयार कपडे, खेळणी, पादत्राणे आदी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. नवस फेडण्यासाठी मेणापासून तयार केलेले मानवी अवयव, मेणबत्त्यांची तसेच चणे, खाजे व अन्य पारंपरिक मिठाई लाखो रुपयांची उलाढाल होत असते. फेस्तात मुंबई तसेच अन्य ठिकाणहून आलेल्या विक्रेत्यांची संख्याही लक्षणीय आहे.
पवित्र शवदर्शन पुढील वर्षी
दरम्यान, या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ‘गोंयचो सायब’ म्हणून ओळखल्या जाणाय्रा सेंट फ्रान्सिस झेवियरचे ४00 वर्षांपूर्वीचे पार्थिव येथे जतन करुन ठेवले असून ते अद्याप जसेच्या तसे असल्याची भाविकांची भावना आहे. दर दहा वर्षानी ही पार्थिव भाविकांसाठी प्रदर्शनासाठी खुले केले जाते. २0१४ साली पवित्र शवदर्शन झाले होते. आता दहा वर्षांनी म्हणजेच पुढील वर्षी २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत पुन: ते होणार आहे.