Goa: पवित्र शवप्रदर्शनासाठीच्या सोईसुविधांचे काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
By किशोर कुबल | Published: August 23, 2024 02:22 PM2024-08-23T14:22:44+5:302024-08-23T14:23:06+5:30
Goa News: गोव्यात जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठीच्या साधन सुविधांचे काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शवप्रदर्शन सचिवालयाची स्थापना करण्यात आली असून काल मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत एकूण तयारीचा आढावा घेतला.
- किशोर कुबल
पणजी - गोव्यात जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठीच्या साधन सुविधांचे काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शवप्रदर्शन सचिवालयाची स्थापना करण्यात आली असून काल मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत एकूण तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, '२१ नोव्हेंबर पासून ५ जानेवारी पर्यंत ४५ दिवस चालणार असलेल्या या पवित्र शिवप्रदर्शनासाठी देश,विदेशातून लाखो भाविक सहभागी होणार आहेत. पोप फ्रान्सिस यांनाही निमंत्रित केलेले आहे. एकूण तयारीचा आढावा मी घेतला असून आता वेगाने कामे सुरू होतील. पायाभूत सुविधांवरच २०० कोटी रुपये खर्च होईल तसेच इतर मिळून हा खर्च ४०० कोटींवरही पोहचू शकतो. केंद्र सरकारकडूनही त्यासाठी अर्थसाहाय्य मिळणार आहे.'
भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोर्टल उघडले जाणार असून भाविकांनी तेथे आपली ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणी केलेल्यांची निवास व इतर व्यवस्था केली जाईल.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'पवित्र शव प्रदर्शन सचिवालय जुने गोवे येथून कार्यरत राहील. चालू असलेली बांधकामे तसेच इतर सोयी सुविधांचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल. जुने गोवेंतील बॉ जिझस बासिलिका व आवारातील इतर चर्चमध्ये कामे सुरू आहेत.'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हा एक आंतरराष्ट्रीय इव्हेंट होईल. सार्वजनिक बांधकाम, महसूल तसेच इतर खात्यांना कामाला लावले आहे. पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यापासून भाजप सरकारच्या काळातच २००४ पासून या पवित्र शव प्रदर्शनाचा दर्जा वाढला. जुने गोवें भागात बगल रस्ते आले व इतर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या.'
पत्रकार परिषदेस समितीवरील सहनिमंत्रक वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा ,आमदार राजेश फळदेसाई तसेच चर्चा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस दल, उपजिल्हाधिकारी व इतरांची उच्चस्तरीय बैठक घेतली.