Goa: गोव्याला केंद्राकडून विशेष वागणूक, पुरेसा निधीही, खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
By किशोर कुबल | Published: April 30, 2024 03:03 PM2024-04-30T15:03:07+5:302024-04-30T15:03:38+5:30
Goa Lok Sabha Election 2024: गोव्याला केंद्र सरकारकडून वेळोवेळी विशेष वागणूक मिळत आहे. तसेच पुरेसा निधीही दिला जात आहे. त्यामुळे आणखी खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
- किशोर कुबल
पणजी - गोव्याला केंद्र सरकारकडून वेळोवेळी विशेष वागणूक मिळत आहे. तसेच पुरेसा निधीही दिला जात आहे. त्यामुळे आणखी खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, मोदीजींनी नुकत्याच झालेल्या जाहीर सभेतही गोव्याविषयी विशेष उद्गार काढलेले आहेत. गोव्याला काहीही कमी पडू देणार ना,ही असे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलेले आहे. गोव्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारने मार्गी लावले आहेत. आतापर्यंत ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी गोव्याला दिला. मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आला. आयुष इस्पितळ दिले. झुवारी नदीवर नवीन पूल आला. अटल सेतू, राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण आदी अनेक प्रकल्प आले. मोदीजींनी गोव्यातील मच्छिमार बांधवांनाही आश्वस्त केले आहे. सीआरझेडच्या कचाट्यातून मच्छीमारांना सोडवण्यात येईल. कुणाच्याही घरावर टाच येणार नाही, अशी हमी देण्यात आलेली आहे.
गोव्याला खास दर्जा देण्याच्या बाबतीत भाजपने कोणतेही आश्वासन न दिल्याने किंवा मोदीजींकडून याबाबतीत कोणतीही घोषणा न झाल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. केंद्र सरकारकडे खास दर्जाच्या मागणीचा पाठपुरावा राज्य सरकारने थांबवल्याने टीका केली जात होती. मुख्यमंत्र्यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी आता खास दर्जाचा प्रश्नच नसल्याचे सांगून या विषयावर पडदा पाडला आहे.