गोव्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक तंटे वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 04:14 PM2018-01-03T16:14:00+5:302018-01-03T16:14:22+5:30

In Goa, there was a lot of violence against local people | गोव्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक तंटे वाढले

गोव्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक तंटे वाढले

Next

पणजी : गोवा प्रदेश हा शांत म्हणून ओळखला जात असला तरी, अलिकडे स्थानिक विरुद्ध पर्यटक असे तंटे गोव्यात वाढत चालले आहेत. गेल्या काही महिन्यांत पर्यटकांचे स्थानिकांशी  वाद होण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत व पोलिसांतही गुन्हे नोंद झाले आहेत. मंगळवारी पोलिसांनी अशा एका वादाबाबत तेलंगणमधील पंधरा पर्यटकांना अटक केली.

पूर्वी विदेशी पर्यटक आणि स्थानिक गोमंतकीय असे वाद होत होते. रशियन व नायजेरीयन व्यक्ती गोव्यात येतात आणि गोव्यातच बेकायदा वास्तव्य करतात. तसेच टॅक्सी व्यवसायातही घुसतात. विदेशी व्यक्ती बेकायदा टॅक्सी व्यवसाय करत असल्याच्या अनेक तक्रारी वाहतूक खात्याकडे व स्थानिक आमदारांकडे येतात. पर्यटक बनून आलेल्या विदेशी व्यक्ती रेस्टॉरंट्स, शॉक चालविण्याचा व्यवसाय करतात व त्यातून गोमंतकीयांच्या हितसंबंधांना बाधा येते आणि वादाची ठिणगी पडते. अलिकडे स्थानिक विरुद्ध विदेशी पर्यटक असे तंटे कमी झाले पण देशी पर्यटक आणि गोमंतकीय व्यक्ती यांच्यात मात्र भांडणो वाढू लागली आहेत. 

कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या भागातून रोज हजारो पर्यटकांची वाहने गोव्यात येतात. काहीवेळा वाहन पार्किंग करण्याच्या विषयावरून स्थानिकांशी वाद निर्माण होतो तर काहीवेळा उघड्यावर पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालतात व त्यामुळेही वादाची ठिणगी पडते. काही देशी पर्यटक ड्रग्ज खरेदी- विक्री व्यवसायात गुंततात व ते देखील वादाला कारण ठरते. अलिकडे वीसपेक्षा जास्त देशी पर्यटकांना गोवा पोलिसांनी अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अटक केलेली आहे. अनेकदा स्थानिकांच्या वाहनांची देशी पर्यटकांच्या वाहनांशी टक्कर होते आणि भांडण सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मेरशी येथे मुंबईतील काही पर्यटकांना स्थानिकांनी मारहाण केली होती. मंगळवारी तेलंगणमधील पंधरा पर्यटकांनी मिळून कळंगुट येथे एका गेस्ट हाऊसच्या कर्मचा:यावर खुनी हल्ला केला. यामुळे कळंगुट ह्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी पंधराही पर्यटकांना अठक करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंद केला आहे.

गोव्यात येणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांनी कसे वागायला हवे याविषयी आता पर्यटन खाते तसेच पोलिस खात्याने मिळून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी मागणी गोमंतकीयांमधून केली जाऊ लागली आहे. गोव्यात देशी पर्यटकांची संख्या रोज वाढत चालली असून त्यातून विविध समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत.
 

Web Title: In Goa, there was a lot of violence against local people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.