गोवा : तिस-या मांडवी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जानेवारीत उद्घाटन होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 12:47 PM2018-10-07T12:47:40+5:302018-10-07T14:44:55+5:30
गोव्यात राष्ट्रीय महामार्ग 17 वर महत्त्वाचा दुवा ठरणार असलेल्या तिस-या मांडवी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे.
पणजी : गोव्यात राष्ट्रीय महामार्ग 17 वर महत्त्वाचा दुवा ठरणार असलेल्या तिस-या मांडवी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणे पूर्णपणे देशी तंत्रज्ञान या पुलासाठी वापरण्यात आले आहे. देशातील हा तिसरा मोठा केबल स्टेड पूल ठरणार आहे.
साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, ‘बांधकाम क्षेत्रातील आघाडीची मेसर्स लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनी तसेच जीएसआयडीसी आणि आयआयटी, चेन्नई यांनी या पुलाचे डिझाईन बनवले असून केवळ जर्मनीचे केबल वगळता पुलासाठी सर्व साहित्यही देशी बनावटीचेच वापरण्यात आले आहे. खा-या हवेमुळे लोखंडी सळ्या गंजतात त्यामुळे जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनीकडून खास बनावटीच्या सळ्या आणल्या. पुलाच्या काँक्रिटीकरणानंतर पाणी न वापरता प्रथमच पॉलिमर थर चढवला. अन्यथा काँक्रिटीकरणानंतर लाखो लिटर पाणी लागले असते.’
डिसेंबरपर्यंत पूल पूर्ण होणार असा दावा करताना उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तत्त्वत: 12 जानेवारी ही तारीख आम्ही घेतलेली आहे, असे कुंकळ्येंकर यांनी सांगितले. या पुलामुळे उत्तरेकडून येणा-या वाहनधारकांना राजधानी शहरात न येता थेट फोंडा, मडगांव, वास्कोला जाता येईल तसेच दक्षिणेकडून येणा-या उत्तरेच्या दिशेने थेट जाता येईल. यामुळे राजधानी शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे. पुंडलिकनगर ते मेरशी नाक्यापर्यंत या पुलाचे बांधकाम चालू आहे. या केबल स्टेड पुलाच्या उत्तरेकडील भागात केवळ एका स्पॅनचे काम बाकी आहे. उड्डाणपुलाचे तसेच जोडरस्त्यांचे कामही वेगात चालू आहे.
जोड उड्डाण पुलासह एकूण 4434 मीटर लांबीचा आणि 21 मीटर रुंदीचा हा चौपदरी पूल असेल. नदीवर प्रत्यक्ष 600 मीटरचा पूल केबल स्टेड आहे. नदीपात्रातील काम पूर्ण झाले आहे. या पुलाचा अंदाजित खर्च 822 कोटी रुपये आहे. साधन सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी संदिप चोडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाऊस ओसरल्याने आता हॉटमिक्सिंग डांबरीकरणाचे काम हाती घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ते म्हणाले की, उत्तरेकडील केवळ एका कमानीचे काम बाकी आहे. मडगांवच्या दिशेने जाण्यासाठी रॅम्पचे काम नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण केले जाईल. फोंड्याच्या दिशेने जाण्यासाठी रॅम्पचे कामही युद्ध पातळीवर चालू आहे.’