गोवा : मांडवी नदीत बर्निंग फेरिबोटचा थरार; फेरीबोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 04:21 PM2024-03-18T16:21:12+5:302024-03-18T16:21:49+5:30
मांडवी नदीत चोडण ते रायबंदर या मार्गावर दैनंदिन वाहतूक सेवा देणाऱ्या फेरीबोट सेवा प्रदान करणाऱ्या ‘बेती’ या फेरीबोटला प्रवासादरम्यान आग लागल्याचा प्रकार सोमवारी घडला.
पणजी : मांडवी नदीत चोडण ते रायबंदर या मार्गावर दैनंदिन वाहतूक सेवा देणाऱ्या फेरीबोट सेवा प्रदान करणाऱ्या ‘बेती’ या फेरीबोटला प्रवासादरम्यान आग लागल्याचा प्रकार सोमवारी घडला. अचानक धूर येऊ लागलेल्या या फेरीबोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. या प्रकाराने फेरीबोटींच्या सुरक्षिततेबाबत लोकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
सोमवारी सकाळी ही घटना घडल्याचे फेरीबोटीतील प्रवाशांनी सांगितले.
बोटीमधील कर्मचाऱ्यांनीच अग्निप्रतिबंधक साहित्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही. बेती फेरीबोटीच्या सायलेन्सरवर एक मोठी दोरी बांधलेली असते. सायलेन्सरची गरम हवा फेरी चालकाला लागू नये यासाठी ही जाड मोठी दोरी गुंडाळलेली असते. दोरी जुनी झाल्याने कमकुवत झाली होती. त्या दोरीने पेट घेतल्याचे समोर येत आहे. आग आटोक्यात आणल्यानंतर या फेरीबोटीतून सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच अश्याप्रकारची घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्यातील जुन्या होत चाललेल्या फेरीबोटींची देखरेख होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.