देशी पर्यटकांच्या पसंतीत गोवा टॉप-10 मधून बाहेर, पहिल्या स्थानावर तामिळनाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 04:04 PM2017-11-29T16:04:06+5:302017-11-29T16:08:10+5:30
पर्यटकांचा स्वर्ग अशी गोवा पर्यटन खात्याकडून स्वत:ची जाहिरात केली जाते. मात्र, एका खासगी एजन्सीने केलेल्या सर्व्हेक्षणात गोव्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या पाच राज्यात तिसरा क्रमांक दिला गेला असला तरी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 2017 चा जो अहवाल जारी केला आहे, त्यात देशी पर्यटकांमध्ये गोवा खिजगणतीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मडगाव : पर्यटकांचा स्वर्ग अशी गोवा पर्यटन खात्याकडून स्वत:ची जाहिरात केली जाते. मात्र, एका खासगी एजन्सीने केलेल्या सर्व्हेक्षणात गोव्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या पाच राज्यात तिसरा क्रमांक दिला गेला असला तरी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 2017 चा जो अहवाल जारी केला आहे, त्यात देशी पर्यटकांमध्ये गोवा खिजगणतीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालात पहिल्या दहा राज्यात गोव्याचे नाव दिसत नाही.
2016 साली आलेल्या पर्यटकांच्या आकडेवारीनुसार तामिळनाडू राज्याचा पर्यटन क्षेत्रत अग्रक्रमांक असून एकूण 34.38 कोटी पर्यटकांनी या राज्याला भेट दिली आहे. तर दहाव्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानला 4.14 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. या गटात गोव्याचा उल्लेख इतर राज्यामध्ये करण्यात आला आहे.
विदेशी पर्यटकांच्या गटातही गोवा नवव्या क्रमांकावर असून 2016 साली 6.80 लाख विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिल्याचे हा अहवाल म्हणतो. देशातील एकूण टक्केवारीत हे प्रमाण केवळ 2.8 टक्के आहे. या गटात पुन्हा एकदा तामिळनाडूच पहिल्या क्रमांकावर असून दुस-या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. एकूण टक्केवारीत तामिळनाडूला 19.1 टक्के तर महाराष्ट्राला 18.9 टक्के विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्या पाठोपाठ उत्तरप्रदेश, दिल्ली, पं. बंगाल, राजस्थान, केरळ, बिहार असा क्रम असून दहाव्या क्रमांकावर पंजाबची वर्णी लागते.
आंतरराष्ट्रीय चेक पोस्ट (विमानतळ) या गटातही गोव्याचा 9 वा क्रमांक आहे. 2016 साली एकूण 2.79 लाख पर्यटकांची येथे नोंद झालेली आहे. एकूण टक्केवारीत हे प्रमाण केवळ 3.17 टक्के आहे. ई-व्हिसा घेऊन आलेल्या पर्यटकांच्या गटात गोव्यातील प्रमाण काही प्रमाणात चांगले आहे. मागच्या वर्षी दाबोळी विमानतळावर 1.03 लाख पर्यटकांनी ई-व्हिसासह भेट दिली असून या गटात गोव्याला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. यातील एकूण टक्केवारी 9.6 टक्के इतकी आहे. साधनसामग्रीच्या बाबतीतही गोवा बराच मागे असून 31 डिसेंबर 2015 र्पयत केरळात 392 तारांकित हॉटेलात 11,114 खोल्यांची नोंद झाली आहे. त्या तुलनेत गोव्यात 44 तारांकित हॉटेलात केवळ 4317 खोल्यांची नोंद झालेली आहे.